“स्टे कूल मॉम ! सो सिंपल इट इज !”

Stay Cool Mom - Maharastra Today

मुलांचे त्यादिवशीचे बोलणे ऐकून सुनीता खरंतर स्तब्ध झाली.” अग आई तु का नाही केलीस नोकरी ? त्यामुळे आम्ही आणखीन इंडिपेंडेंट झालो असतो खरं तर !आणि बाबांनाही डबल इंजिन मुळे मदत मिळवून आपण ऐश केली असती मस्त !”आतून खूप संताप आला होता तिला .दुखावली गेली होती ती ,बरच काही त्याला सुनावताही आलं असतं . पण बेजबाबदारपणे “स्टे कूल “राहणारी ती नसल्याने तिने त्या क्षणाला “समंजस शांत रहाणे “पसंत केले. जरा डोकं खरंच शांत झालं की वास्तव परिस्थिती मुलांना समजावून सांगणार होती.

सुनीताची दोन्ही मुले आता मोठी झालेली होती . तिला भरपूर वेळ मिळायला लागला सुरुवातीपासून मुलांना छान वाढवायचं या हेतूने तिने करियरला फाटा दिलेला होता. अतिशय उत्तम पद तिने नाकारले होते .परंतु आता मुलं मोठी झाली म्हणून पार्ट टाइम जॉब वगैरे करण्याचा विचार असल्याचं सुनिता ने मुलांना सांगितलं, तेव्हा मुलांनी हे ऐकवलं होतं.

अलीकडे असे बरेचदाच होई. काहीतरी जबाबदारीचे काम मुलांवर सोपवायचे म्हणून तिची घालमेल सुरू होई. आणि मग अचानक चिरंजीव उगवत. त्यांच्या पद्धतीने त्याने तो प्रश्न सोडवलेला असे आणि आल्यावर तो घाईघाईत, “ओह ! स्टे कूल मॉम !”म्हणून मोजे तिकडे तर बूट दुसरीकडे फेकून लॅपटॉप हातात घेऊन त्यात बुडून जात असे. सुनीताला अशावेळी प्रश्न पडायचा , की,” अरे आपण संस्कार केलेली हीच का ती मुलं ?” आपण संस्कार करण्यात चुकलो की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण कायम जबाबदारीने वागण्याचा मणामणाचं ओझं मानेवर घेऊन वावरतो ? आज त्यांना उपलब्ध झालेली क्षेत्र किंवा माहितीचा धबधबा खूप जास्त आहे .लहानपणापासून खूप संघर्ष आहे. एका वेळी अनेक आघाड्यांवर ते लढतात.

आज सकाळपासून दोघेजण लवकर घराबाहेर पडली होती. सुनीता हातात कॉफी घेऊन,पेपर जवळ घेऊन बसली .रत्यावरची पाठीला सॅक अडकवलेली मुले बघून तिला परत मुलांची आठवण आली. दोघांच्याही स्वतःच्या काही आवडी निवडी आणि एक्टिविटी चालू असायच्या. मुलगा कवितांना संगीत द्यायचा . स्वतः उत्तम कविता करत असे आणि छान गायचा देखील. तर मुलगी भरतनाट्यम् करत होती. या दोन्ही गोष्टींसाठी भरपूर मेहनत लागत होती .संघर्ष करावा लागत होता. तो संघर्ष ती स्वतः बघत होती आणि त्याच्यामुळेच ती परवा मुलांवर चिडली नव्हती. त्यांच्या म्हणण्यात नेहमीच काहीतरी तथ्य असतं असा विचार आज काल तिला करावासा वाटत असेल. आपण समजतो तितकी मुलं बेजबाबदार नाहीत . फक्त त्यांची कार्याची पद्धती वेगळी आहे. स्मार्ट वर्क करतात ती !

सुनीताला आठ दिवसांपूर्वीची घटना आठवली .घरी मुलांची आत्या आणि बरोबर दोन तीन जण येणार होते. तिची नेहमीची पद्धती म्हणजे कोणी पाहुणे येणार म्हंटले किती यथास्थित तयारी करत असे. अगदी नाश्त्याला काय ? स्वयंपाकात वेगळं काय करायचं ? घरात दूध ताक भरपूर आहे की नाही ? पासून चादरी बदलवणे, घर स्वच्छ ठेवणे, ठेवणीतल्या कपबशा काढणे, अगदी बाथरूम मध्ये साबण आहे की नाही, नॅपकिन्स आहेत की नाही नाही हे ती व्यवस्थित बघत होती. पण आजकाल कोणी मदतीला नसल्याने थकून जात असे.

आठ दिवसापूर्वी ची गोष्ट ! मुलगी बाहेरून आली, आणि तिची चिडचिड बघून पटकन विचारले ? ,”असं नेमक काय झालं ? किती जण येणार आहेत ?” आणि मग म्हणाली, नो प्रॉब्लेम मॉम ! स्टे कूल ! पटकन तिने स्विगीला ऑर्डर दिली होती आणि ती पुढच्या कामाला जायला निघाली देखील होती. तिचा संध्याकाळी परफॉर्मन्स होता. जाता जाता म्हणाली, सो सिंपल इट इज मॉम ! जायच्या आधीच तिची आत्या आणि पाहुणे येऊन पोहोचले होते. तिने जाता जाता त्यांना वाकून एका हाताने नमस्कार केला, आत्याला गळा मिठी मारली, आणि लवकर येते रात्री , असं म्हणून ती गेली देखील . आत्या कोण कौतुक करत होती तिचं !

सुनीताला स्वतःचाच खूप राग आला ,संध्याकाळी एवढं परफॉर्मन्स ! एखाद्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं ? आणि येणारी मंडळी तर घरचीच होती ना ! पण आपली मेली सवय जात नाही. उगीच हाडाची काडे करत बसतो. मुले म्हणतात त्याप्रमाणे आर्थिक दृष्टीने सक्षम आहोत, सगळ्या सोयी उपलब्ध आहेत आज-काल. त्याचा फायदा घ्यायला पाहिजे .

परवाचीच गोष्ट मुलाच्या कॉलेजची रिटेस्ट होती. आधीच्या काही कारणांमुळे ती परत घेतली होती. कारणही तसच होतं की नेट रेंज नव्हती अवेलेबल आणि तो प्रवासात होता .त्यामुळे retest ला परवानगी मिळाली. मुलगा अधून मधून लॅपटॉप वर त्याचं काम करत होता आणि म्हणाला ,”प्रिंट मारू का आजच्या सिल्याबसची ? “त्यावर सुनीताची ,एक आई म्हणूनची नीतिमत्ता उफाळून आली.”नाही रे ! काहीतरीच काय त्याऐवजी तेवढा वेळ अभ्यास कर!”तिला स्वतःचा अभ्यास परीक्षा आठवत होती आणि कॉपी करणं गंभीर गुन्हा होता तिच्यासाठी !त्यातल्या त्यात ,”हो !हो !कर चीटिग “असा सल्ला ती एक आई म्हणून मुलाला कसा देऊ शकत होती ?

त्यावर मुलगा म्हणाला ,”अरे आई ! काय होतं सांग ना अभ्यास करून! अन माझं काय वाईट होतंय ? म्हटलं म्हणजे लगेच करतोय का काय मी चीटिंग ? मागच्या टेस्टमध्ये 25 पैकी 20 च्या वरच मार्क मिळाले आहेत मला! आणि चॅटिंग करायचं तर पूर्णच बघून लिहिलं असत ना ! सध्याच्या ऑनलाईन च्या परीक्षेत किती “गुणी मुलं” हरिश्चंद्रा प्रमाणे सच्चेपणाने पेपर देतात माहित आहे का तुला ? अभ्यास होतो ग माझा पटकन !सो सिंपल इट इज ! “

सुनीताला क्षणभर वाटलं की आपण आपल्या आयुष्याची खरंच अनेक वर्ष वाया घालवली की काय ? ती नेहमी बघायची की मुलगा जिथे असतो तिथेच असतो, जे काम करतो ते पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ने करतो, जीव झोकून करतो, त्याच्या मुळे त्याचा अभ्यासही लवकर होतो, आणि इतर ऍक्टिव्हिटीज ही तो उत्तम जमवतो .

बऱ्याच गोष्टी सुनीता मुलांकडं शिकत असते. त्यावर विचार करीत असते. पण तरीही काही बाबतीत त्यांचा तटस्थपणा, भावनिक अलिप्तता तिला पटत नाही. छोट्या छोट्या आनंदांना ती मुकतात आहे असेच तिला वाटते. लहान मुलांचे ओव्हरफ्लो होणारे ज्ञान आणि त्यांची सर्वत्र होणारी वाहवा बघून, कमी काळात मुलांच्या वाढलेल्या क्षमता बघून, तर आश्चर्यचकित होतेच ती , पण …..कुठेतरी तिला त्यांची काळजी पण वाटते. लिटिल चॅम्पस्, लिटिल शेप्सस् , रोबोटिक्स मध्ये सुवर्णपदक मिळवणे, यात काही दिवस झगमगत्या दुनियेत वावरल्या वर तिथून परत आल्यावर दररोजच्या रुटीन मध्ये ते किती सामावून जावू शकत असतील ही तिची भीती मात्र सार्थच आहे. म्हणूनच त्यांच्या सोबत राहून शिकत असताना आज आवश्यक तिथे बांध व निगराणी, काळजी घेणं मात्र तिने सोडायला नको असं वाटतय मला देखील ! त्यांच्या हाती लागणारी झगमगीत दुनिया, आणि दररोज जगणं यातील फरक आणि समतोल साधायला मात्र यायला हवाच त्यांना !

फ्रेंडस ! तुम्हाला काय वाटतं ?

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER