होळी व धुलीवंदनाच्या सुटीला घरातच रहा; नितीन राऊतांचे आवाहन

नागपूर :- कोरोनाचे (Corona) वाढते प्रमाण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षी सार्वजनिक होळी (Holi) आणि धुळीवंदन उत्सवांना बंदी घातली आहे. २६ मार्चला जिल्ह्यात रुग्णांची संख्या ४ हजारावर पोहचली. अशावेळी होळी व धुलीवंदन उत्सव नागरिकांनी साधेपणाने, घरामध्येच साजरा करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले आहे.

अर्थचक्र बंद होऊ नये म्हणून काही सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, याचीदेखील काळजी घेतली जात आहे. मात्र, कारण नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. बाधितांची संख्या अचानक वाढल्यास वैद्यकीय यंत्रणेवरदेखील ताण येऊ शकतो. शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट झाले आहे. अशावेळी कोरोना प्रोटोकॉल पाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य म्हणून घरात राहणे आवश्यक आहे. मास्क लावणे, शारिरीक दूरी पाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. यावर प्रशासन काम करत आहे. मात्र, नागरिकांनीही या काळात सहयोग करावा, असे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, मेयो, मेडिकल व जिल्हा आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांशी पालकमंत्री रोज संपर्कात आहे राहून आढावा घेत आहे. यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करत आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनीदेखील चाचणी आणि लसीकरणासाठी सहकार्य करून रस्त्यावरील गर्दी कमी होईल, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रशासनाचे निर्देश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी यंदा होळी, धुलीवंदन तसेच शब-ए-बारात उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करावे. या उत्सवांच्या निमित्ताने मिरवणूक काढता येणार नाही. कोरोना प्रतिबंधक नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. दूध विक्री व पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री, किराणा दुकाने, चिकन, मटण ,अंडी व मांस दुकाने, वाहन दुरुस्ती, पशुखाद्य दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेश प्रशासनामार्फत जाहीर केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER