इंधन दरवाढीविरोधात ७ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन; नाना पटोलेंचा इशारा

Nana Patole

मुंबई : आधीच कोरोनाने देशात थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे किंमती गगनाला भिडले आहे. या वाढत्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने दंड थोपाटले आहे. काँग्रेस ७ जून रोजी (सोमवारी) इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्या होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. “या दरोडेखोरी विरोधात सोमवारी सकाळी ११.०० वाजता राज्यभर एकाचवेळी १ हजार ठिकाणी तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ३ पेट्रोल पंपांवर आंदोलन करून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला जाणार आहे.” असे पटोले म्हणाले.

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला तर डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. तसेच गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यांना बऱ्याच अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात उद्या राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असे नाना पटोलेंनी सांगितले.

सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका यूपीए सरकारने घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल इतकी आहे. असे असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नाही, ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button