राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणे थांबवले पाहिजे; फडणवीसांची चेतावणी

Devendra Fadnavis - Maharastra Today

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असतात. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणे थांबवले पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचे तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

राज्याचे अधिकार अबाधित
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावरून त्यांनी राज्य सरकारला घेरले. १०२व्या घटनादुरुस्तीने राज्याचे अधिकार राज्याचे राहतील. मात्र, याबद्दल कोर्टाचे दुमत होते. दोन न्यायाधीशांनी घटनादुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार अबाधित राहणार आहेत, तर तीन न्यायाधीशांनी एखाद्या वर्गाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राचा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे हे सर्व अधिकार राज्यांचेच असल्याचे सांगण्यासाठी केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले आहे.

सरकारची नौटंकी
राज्य सरकार एखाद्या समाजाला मागास घोषित करू शकते. मागासवर्ग आयोगाबाबत कोर्टाने दिलेल्या निकालावर राज्याने पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी. केंद्र करू शकत नाही. सर्वच केंद्राने करायचे तर राज्यांनी माशा मारायच्या का? असा सवाल करतानाच राज्यपालांच्या हातात काही नसतानाही सत्ताधारी राज्यपालांना भेटत आहेत. ही सर्व सरकारची नौटंकी आहे. हा सर्व टाईमपास सुरू आहे, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण : कलम १०२ बाबत फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल फडणवीसांनी केंद्र सरकारचे केले स्वागत  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button