लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स न पाळल्याने राज्याची स्थिती वाईट – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

पाटणा : पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागले आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन उठवताना केंद्राने काही गाईडलाईन्स दिल्या, त्यादेखील मान्य करायला महाराष्ट्र सरकार तयार नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत बिकट होत चालली आहे. महाराष्ट्र सरकारने बेभरोशी न राहता निर्णय घेणारे राज्य म्हणून पुन्हा लौकिक मिळवावा, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून सरकारवर टीका केली. ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत ते म्हणाले – महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन, आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागले आहे. कोरोना लॉकडाऊन उठवतांना केंद्राने अनेक गाइडलाइन्स दिल्या, परंतु महाराष्ट्र शासन त्यांना मान्य करायलाच तयार नाही. आरोग्य सेतूचे अॅप आले, त्यातून लोकांची तब्येत कशी आहे हे कळते. कोरोनाबाधित आहे की नाही हे कळते. परंतु महाराष्ट्र शासनाने अजूनही लॉकडाउन उठवला नाही, अशी परिस्थिती आहे. कदाचित या व्हीडिओनंतर उठवतील अशी परिस्थिती आहे.

प्रकाश आंबेडकर सध्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बिहारमध्ये असून त्यांनी अनेक राज्यांचा दौरा केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की लॉकडाऊन नंतर इतर राज्यांची आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रापेक्षाही चांगली आहे. इतर राज्यांनी लॉकडाऊन उठविताना केंद्राच्या गाईडलाईन्सचा आधार घेतला होता. मात्र, महाराष्ट्र सरकार केंद्राच्या गाईडलाईन्स मान्य करायला तयार नाही. महाराष्ट्र सरकारने अजूनही लॉकडाउन उठविला नाही. राज्यातील मंदिर बंद असल्याने स्थानिक लोकांचे नुकसान होते आहे. त्यामुळे बेभरवशावर न राहता पुरोगामी निर्णय घेणारे राज्य उभे करावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER