सांगली : आता लालपरी करणार मालाचीही वाहतूक

State Transport Co St buses

सांगली : प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी ( एसटी) आता प्रवाशांबरोबरच शेतकरी, व्यापारी, कारखानदार यांच्या मालाचीही वाहतूक करणार आहे. त्यासाठी एसटीने मालवाहतूक ट्रक तयार ठेवलेत. आवश्यकता भासल्यास एसटीतील सीट्स काढून एसटीतून माल वाहतुकीची तयारी ठेवण्यात आल्याची माहिती सांगलीच्या विभागीय वाहतूक नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली आहे.

लॉकडाऊनचा फटका एसटीला बसला आहे.कोरोनामुळे एसटी महामंडळासमोर मोठे संकट उभे राहिले असून यातून बाहेर पडण्यासाठी मालवाहतुकीसाठी लालपरी सज्ज झाली आहे.

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 14 मार्चपासून एसटी च्या फेेऱ्या कमी-कमी करण्यात आल्या. 24 मार्चपासून लॉकडाउन जाहीर केल्यानंतर एसटी च्या सर्वच फेऱ्या बंद करण्यात आल्या. प्रत्येक आगारात मोजके कर्मचारी कार्यरत ठेवले. एक मार्च ते 30 एप्रिल अखेर एसटी महामंडळाने भारमान वाढवा अभियान सुरू केले होते.

परंतू लॉकडाउनचा मोठा फटका सहन करावा लागला. भारमान वाढवा अभियानाच्या काळातच एसटी जागेवर थांबली. लॉकडाउन शिथील केल्यानंतर 22 मे पासून एसटी धावू लागली आहे. परंतू कोरोनामुळे आसन क्षमता निम्मीच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.एका सीटवर एकच प्रवासी याप्रमाणे 22 ते 25 प्रवासी नेले जातात. त्यामुळे सध्या एसटी पुन्हा तोट्यातच धावू लागली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवतााना झालेला तोटा भरून काढण्याचे महामंडळासमोर आव्हान उभे राहिले आहे. आगामी काळातील तोटा गृहीत धरून एसटी पुन्हा फायद्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. एका एसटी बसमधून साधारण नऊ टन इतका माल वाहून नेला जाऊ शकतो. माफक दरात सुरक्षितपणे माल वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाने ही सुविधा प्रथमच देऊ केली आहे. 24 तास ही सेवा उपलब्ध असून त्यासाठी एसटी बसेस निर्जंतुकीकरण केल्या जाणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER