‘लालदिव्या’साठी प्रदेशाध्यक्षपद नाकारलं, म्हणून नाथाभाऊंचं मुख्यमंत्रिपद गेलं – रावसाहेब दानवे

Eknath Khadse-Raosaheb Danave

मुंबई: पक्षात एकेकाळी फक्त नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी ते नाकारलं. भविष्यात भाजपची सत्ता येईल की नाही, असं नाथाभाऊंना वाटलं. त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं, असा गौप्यस्फोट भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी केला.

रावसाहेब दानवे यांनी आज ‘टीव्ही9 मराठी’शी विशेष बातचीत केली असता त्यांनी ना हा गौप्यस्फोट केला. नाथाभाऊ भाजप सोडून का गेले याला अनेक कारणे आहेत. कुठून सुरुवात करावी हा प्रश्न आहे. एकेकाळी भाजपमध्ये केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. पण भाजपची सत्ता येईल की नाही याची शंका असल्याने नाथाभाऊंनी तब्येतीचं कारण देत लालदिव्यासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडलं. त्यामुळे हे पद देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra fadnavis) आलं. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षालाच मुख्यमंत्री केलं जातं. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याकाळात खडसेंनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं असतं तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रिपदावर दावा करता आला असता, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला.

भाजपमध्ये मी नाथाभाऊंपेक्षा जेष्ठ आहे. त्यामुळं आम्हा सर्वांना एकमेकांची वाटचाल माहिती आहे. मी प्रदेशाध्यक्ष असताना काही गोष्टी फडणवीसांना मान्य नव्हत्या. पण मी त्यांना पटवून दिल्या आणि त्यांना त्या गोष्टी मान्य कराव्या लागल्या. त्यामुळे राज्यात एकटे फडणवीस पक्ष चालवतात हा आरोप आपल्याला मान्य नाही. भाजपमध्ये (BJP) एक ठरलेली प्रक्रिया आहे. भाजपमध्ये कुणीही एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. पक्षात सामूहिकरित्याच निर्णय होतात. तसंच कुणावरही निर्णय लादला जात नाही, असे स्पष्टीकरणही दानवे यांनी दिले.

ही बातमी पण वाचा : नाथाभाऊ मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच, त्यांनी पवारांच्या नेतृत्वात काम केले;दानवेंचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER