हे शिवसैनिकांचे नव्हे, ‘मातोश्री’चे राज्य; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका

Narayan Rane & Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात सध्या गाजत असलेल्या मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्युप्रकरणावरून भाजपकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे. याचा संबंध थेट प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याशी असल्यानं हे प्रकरण हायव्होल्टेज बनलं आहे. अशा वेळी भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. सगळ्या पदांच्या बदल्यांचे टेंडर निघत आहेत. त्यामुळे टेंडर देऊन पोस्टिंग घेतलेले लोक काय प्रामाणिकपणे काम करणार? असा प्रश्न उपस्थित करून राणेंनी कुंपणच शेत खात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे सरकारवर केला.

मुकेश अंबानींच्या घराच्या समोर जीप मिळते काय, तिथे पहिल्यांदा सचिन वाझेच कसे पोहचले? मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे संबंध काय? त्यांची ओळख कशी? अशी प्रश्नांची सरबत्तीच राणे यांनी केली. मनसुख हिरेन यांना या प्रकरणातील सगळं काही माहिती होतं, तेच मुख्य दुवा होते. त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला. संजय राठोड (Sanjay Rathod) प्रकरण, दिशा सालियान प्रकरण किंवा सुशांत सिंह प्रकरण, या सगळ्यात आत्महत्या केल्याचे सांगून हत्या केल्या जात आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. एखादा मुख्यमंत्री आपल्याला सत्ता चालवायला जमत नाही म्हणून बाहेर पडला असता, असा टोलाही राणेंनी लगावला.

यशवंतराव चव्हाण आणि एकापेक्षा एक मुख्यमंत्री या राज्याला लाभले. पण उद्धव ठाकरे हे राज्याला अधोगतीकडे घेऊन जाणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे आणि विषय काढतात राम मंदिराचा. हा काय बालिशपणा आहे! राज्यात कायदा आणि कुणाचे मुडदे कुठेही पडू शकतात अशी स्थिती बनली असल्याचा आरोप राणेंनी केला. राज्यभरात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. कोण देसाई आहे? त्याला प्रोटेक्शन दिलं आहे. हे शिवसैनिकांचं राज्य नाही तर मातोश्रीचं राज्य असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.

मी कधी कॉलेजची मागणी केलेली नव्हती. एमसीआयच्या माध्यमातून कॉलेजची परवानगी मिळवली. संपूर्ण परवानग्या घेतल्या. मी माझ्यासाठी कॉलेज किंवा हॉस्पिटल बांधलं नाही. तर सिंधुदुर्गवासीयांसाठी उभारलं. त्यांनी मला सहा वेळा निवडून दिलं. त्यामुळे ऋण फेडण्यासाठी कृतज्ञ भावनेतून रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारलं. स्वत:च्या पैशानं प्रकल्प उभे केले. मी उभारलेले प्रकल्प उद्धव ठाकरेंनी तिथे जाऊन पाहावेत. माझ्या कामाबद्दल त्यांनी बोलू नये, असा खोचक टोलाही राणेंनी लगावला.

ही बातमी पण वाचा : उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी – नारायण राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER