राज्य शासनाने वांद्रे किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे निर्देश महापालिकेला द्यावेत : आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : पोर्तुगिजांनी 1640 साली बांधलेला बँडस्टँड परिसरात असलेल्या वांद्रे किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.

सभागृहात निवेदन सादर करताना शेलार म्हणाले, वांद्रे किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मी 2015 पासून या भागाचा आमदार असून या किल्ल्यासाठी 20 कोटी रुपयांचे डिझाईन बनवून आकर्षण केंद्र व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव आम्ही दिला होता. महानगर पालिकेतील विविध विभागांची प्रशासकीय मंजूरी घेऊन तो प्रस्ताव स्थायी समितीकडे गेला. तो तीन वेळा रोखला गेला. दुर्दैवाने तो दप्तरी दाखल केला गेला.

मुंबई शहरामध्ये असलेल्या किल्ल्याचे सौंदर्यीकरण व मोकळ्या जागेंचे सुशोभीकरण हा राज्यशासनाचा प्राथमिकतेचा भाग असल्यामुळे मनपाने जरी हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला असला तरी राज्य शासनाने महानगर पालिकेला या किल्ल्याच्या सौंदर्यकरणाबाबत पुन्हा निर्देश द्यावे आणि वांद्रे किल्याचे सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरण पुन्हा करून मुंबईच्या सौंदर्यात भर घालावी. आपण राज्य शासनाला तसे निर्देश द्यावे, अशी शेलार यांनी अध्यक्ष नाना पटोले यांना केलेल्या निवेदनातून ही मागणी केली.