सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र

Mumbai Local

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा (Mumbai Local Services) आता सुरु होण्याची शक्यता आहे. सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी, यासाठी राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. एक प्रस्ताव या संदर्भात तयार करून राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेला पाठवला आहे. या प्रस्तावावर विचार विनिमय करून रेल्वेकडे त्यांचे मत राज्य सरकारने मागितले आहे. रेल्वेने प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली असून, येत्या दोन दिवसात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सर्व महिलांसाठी लोकल मध्ये प्रवासाची परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारने आता सर्वांना लोकलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात वेगवेगळ्या कॅटेगरी सांगितल्या आहेत आणि या प्रत्येक कॅटेगरीला प्रवास करण्यासाठी वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार सकाळी ७.३० वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा वाजल्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु ठेवा. तर सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी राज्य सरकारकडून रेल्वेला करण्यात आली आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत म्हणजेच पिक अवर मध्ये केवळ आयकार्ड आणि क्यूआर कोड असलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करू शकतील. या काळात इतर सर्वसामान्य प्रवासी प्रवास करु शकणार नाहीत. तर गर्दी नसणाऱ्या वेळेत म्हणजेच नॉन पिक अवर मध्ये सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

राज्य सरकारने रेल्वेला दिलेला प्रस्ताव…

  • सकाळी पहिल्या लोकल पासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत – सर्वसामान्य प्रवाशी
  • सकाळी आठ वाजल्यापासून ते सकाळी साडेदहा वाजेपर्यंत – फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी
  • सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत – सर्व सामान्य प्रवासी
  • संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत – फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी
  • रात्री आठ वाजल्यापासून ते शेवटच्या लोकल पर्यंत – सर्व सामान्य प्रवासी

याप्रमाणे प्रत्येक कॅटेगरीला वेळ मर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे. तसेच दर एक तासाला फक्त महिलांसाठी विशेष लोकल सोडण्यात यावी असेही प्रस्तावात म्हटले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी नॉन पीक अवर मध्ये देखील प्रवास करू शकणार आहेत. या प्रस्तावातील वेगवेगळ्या कॅटेगरी मुळे गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल असे राज्य सरकारला वाटते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER