आघाडी सरकार अहोरात्र झटत असल्याने आपण कोरोनावर विजय मिळवणारच – शरद पवार

Sharad Pawar-Uddhav Thackeray-corona virus

मुंबई : जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, जगभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. आज कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे घरातच राहणे आहे. लॉक डाऊन दरम्यान मी सुद्धा घराबाहेर पडलेलो नाही. त्यामुळे तुम्हीही घराबाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला केले. पवार यांनी आज दुसऱ्यांदा फेसबुक लाइव्हवरून जनतेशी संवाद साधत त्यांनी इतर मुद्द्यांवरही भाष्य केले.

आज कोरोनाला मात देण्यासाठी राज्य सरकार अहोरात्र काम करत परिस्थितीशी झटत आहे. मी घराबाहेर पडलो तर अख्या पिढीला याचे परिणाम भोगावे लागतील. संकटाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे व्यवस्थाही मोठी करावी लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे दिवसरात्र लक्ष घालून आहे. या कार्यात डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांचे मी अभिनंदन करतो. कोरोनावर आपण विजय मिळवणारच. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांचे कौतुकही केले. त्यासाठी सरकारच्या कार्यात हातभार लावण्याचे आपले कर्तव्य आहे. आज रुग्णालय उघडे असणे गरजेचे झाले आहे. मात्र काही डॉक्टर्स आपले खाजगी दवाखाने बंद ठेवत आहे. संकटकाळी दवाखाने बंद ठेवणे योग्य नाही. अश्या डॉक्टरांनी आपल्या दवाखान्याचे दरवाजे बंद ठेवू नये. दवाखाने उघडे ठेवून सरकारला मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनामुळे आज उद्योगधंदे, शेती व्यवसाय, आणि इतर व्यवसाय बंद पडले आहे. त्यामुळे देशावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर ताण पडणार आहे. येत्या काळात काटकसरीची भूमिका घ्यावी लागेल. पुढचे काही वर्ष आपल्याला याचा सामना करावा लागणार आहे. आज ऊसतोड कामगार रोजगारापासून वंचित झाले आहे. त्यांच्यासमोर पोटाची भूक भागवण्याचे मोठे आव्हान आहे. अश्या कामगारांची सोय कारखान्यातच करण्यात यावी. काही व्यापारी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत असल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र अश्या साठेबाजांना मी सांगू इच्छितो त्यांनी असा गैरप्रकार करू नये.

आज एवढे मोठे आव्हान असूनही राज्य सरकार सामंजस्याची भूमिका घेत आहे. मात्र त्याला सरकारचे दुबळेपण समजू नये. असा इशारा देत राज्यात कोणीही उपाशी राहणार नाही. राज्याकडे पुरेसा अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांनी लागेल तितकेच अन्नधान्य विकत घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले.