राज्य सरकार एसटीला देणार ६०० कोटी; कामगारांना मिळणार रखडलेला पगार

Anil Parab

मुंबई : कोरोनामुळे आर्थिक संकटाच्या गर्तेत फसलेल्या एसटी महामंडळाला मदत म्हणून राज्य सरकार ६०० कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्यामुळे एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे. (Maharashtra government announces Rs 600 crore MSRTC)

राज्यात कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग बंद झालेत. एसटीतून अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. ५० टक्के आसन क्षमतेनेच एसटी चालवण्याचे निर्बंध होते. एसटीच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम झाला. अत्यंत अल्प उत्पन्न मिळत असल्याने दैनंदिन खर्च भागवणे शक्य नव्हते. शिवाय ९८ हजार कामगारांचे पगार रखडले होते.

मागणी मान्य

एसटीला आर्थिक मदत मिळावी म्हणून एसटी महामंडळाने शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या बाबतचे सादरीकरण उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर दैनंदिन खर्चासाठी ६०० कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे अजित पवार यांनी मान्य केले आहे. बैठकीला परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, अर्थ व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, परिवहन विभाचे अप्पर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष् व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.

आधी दिली आहे एक हजार कोटींची मदत

अनिल परब यांनी या आधीही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून १ हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळवून दिले होते. त्यातून एसटीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांमध्ये वेतन देणे शक्य झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button