‘राज्य सरकारने आपल्या कोट्यातून १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करावे’

Atul Bhatkhalkar - CM Uddhav Thackeray

मुंबई :  येत्या १ मेपासून १८ वयोगटावरील सर्वांना लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांना राज्य सरकारने आपल्या कोट्यातून मोफत लस देण्याची योजना आखावी, अशी आग्रही मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

केंद्र सरकारने १८ वर्षे  वयोगटावरील सर्व नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. यातील ५० टक्के लस ही केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनेसुद्धा त्यांच्या कोट्यातून मोफत लस देण्याची योजना तयार करावी, असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.  मध्यप्रदेश, बिहार या राज्यांनी सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांचा मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाला आहे. सद्य:स्थितीतील लॉकडाऊन लावण्याआधी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत  दोन दोन आठवडे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे लोकांचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

त्यामुळे राज्यातील नागरिकांना सरकारने आता तरी मदत करावी, असेही आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे. पहिल्या टाळेबंदीनंतर महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य माणसाला कुठलंही पॅकेज अथवा मदतही केली नाही. त्यामुळे अकार्यक्षम सरकार अशी ओळख झालेल्या महाविकास आघाडी सरकारने कोरोना विरुद्धच्या लसीकरण कार्यक्रमात आपली कार्यक्षमता दाखवण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button