Mumbai Local : लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकार तयार पण, केंद्र सरकारचे राजकारण – नवाब मलिक

Mumbai Local-Nawab Malik.jpg

मुंबई: अनलॉकच्या (Unlock) पहिल्या टप्प्यापासूनच अनेक क्षेत्रात शिथिलता देण्यात आली आहे. अनेक उद्योग, व्यवसाय सुरू झालेत. मात्र, वाहतूकीच्या सोयी अभावी नागरिकांची परवड होत आहे. मुंबईत याची अधिकच तीव्रता जाणवणारी स्थिती आहे. म्हणूनच मुंबईची जीवनवाहीनी लोकल सेवा (Mumbai Local) सुरू करण्याची मागणी मुंबईकर सातत्याने करत आहेत.

लोकल सेवा सुरू करण्यावरून पुन्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांमध्ये वादविवाद पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लोकल सेवेवरून केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

राज्य सरकार अनलॉक प्रक्रियेदरम्यान अनेक सेवांना हिरवा कंदील दाखवत आहे. सरकारच्या परवानगीनंतर रविवारपासून मोनो रेल तर आजपासून पुन्हा एकदा मुंबई मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच लोकलसेवा नियमित करण्यासही राज्य सरकार परवानगी देईल अशी आशा निर्माण झाली असून राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत आज माध्यमांकडे महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

नवाब मलिक यांनी लोकल सेवा सुरु करण्याची मागणी करतानाच राज्य सरकार लोकल सेवा सुरु करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

‘मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर नियमित रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी’, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सरकारने सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यांतरही रेल्वेने अद्याप तशी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे, असे मलिक यांनी नमूद केले. एकीकडे रेल्वेमंत्री पीयुष गोयल हे लोकल सेवा सुरू करण्यास आम्ही तयार आहोत पण राज्य सरकार परवानगी देत नाही, असे सांगतात आणि दुसरीकडे राज्य सरकारने परवानगी देऊनही महिलांसाठी लोकलची दारे खुली केली जात नाहीत, याचा अर्थ काय घ्यावा?, असा सवाल मलिक यांनी केला.

लोकलच्या बाबतीत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER