राज्यकर्त्यांच्या आजारी कारखान्यांसाठी 390 कोटींची साखर पेरणी

co-operative sugar mills

मुंबई : राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांच्या (co-operative sugar factories) कर्जाला 390 कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांबरोबरच विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.यानिमित्ताने सत्ताधाऱ्यांनी केलेल्या साखरपेरणीची चर्चा सुरू आहे.

राज्यातील ऊस गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक कारखाने आर्थिक संकटात असल्याने गाळप हंगाम सुरु करण्यास असमर्थ होते. यातील ३२ कारखान्यांची थकहमी शासनाने घेतली. त्यामुळे या कारखान्यांचा अर्थपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला. या कारखान्यांच्या क्षेत्रात 170 लाख मेट्रिक टन ऊस आहे. त्याची एफआरपी सुमारे 4 हजार 800 कोटी आहे. यापूर्वी राज्य सरकारने दिलेली थकहमी बुडीत निघाल्याने हे कर्ज वसूल होईल याची काळजी घेतली आहे. या कारखान्यांकडून थकहमी वसूल करण्यासाठी प्रति क्विंटल साखरेवर 250 रुपये वसूल करण्यात येणार आहेत.

शासनाने थकहमी घेतलेल्या कारखान्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा भाऊराव चव्हाण, माजी मंत्री प्रकाश सोळंखे यांचा सुंदरराव सोळंखे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विठ्ठलराव विखे, प्रवरानगर, हर्षवर्धन पाटील यांचा निरा भीमा, विजयसिंह मोहिते पाटील यांचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, रावसाहेब दानवे यांचा रामेश्वर, मदन भोसले यांचा किसन वीर, धनंजय महाडिक यांचा मोहोळ येथील भीमा टाकळी, कल्याणराव काळे यांचा पंढरपूर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा कुंभी-कासारी आदी कारखान्यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER