कथित सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना पोलिसांकडून क्लीन चिट

Ajit Pawar

मुंबई : मोठया प्रमाणात गाजलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह ६९ जणांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) क्लीन चिट देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला असून, यामध्ये अजित पवारांसह ६९ जणांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेत मोठ्या प्रमाणात झालेला हा गैरव्यवहार कोणी केला? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

महाराष्ट को ऑप बँक ही शिखर बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेच्यावतीने २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करण्यात आलं होतं. २५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालिन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती.

बँकेच्या मार्फत वाटप केलेले कर्ज सहकारी साखर कारखाने आणि सहकारी सूत गिरण्यांना आणि इतर कंपन्या, कारखाने यांना दिलं होतं. हे कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. मुख्य म्हणजे हे कर्ज राज्यातील अनेक राजकारण्यांच्या कंपन्या, कारखान्यांना दिलं होतं. पुढे हे कर्ज वसूल झालं नाही. त्यामुळे हा एक मोठा गैरव्यवहार आहे, असा याचिकाकर्त्यांनी आरोप केला होता. याच काळात राज्यत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं आघाडी सरकार होतं. यामुळे कर्ज लाभार्थ्यांमध्ये या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि तेव्हाचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या कर्जासाठी मोठ्या शिफारसी होत्या. ही सर्व कर्ज पुढे बुडीत निघालीत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अरोरा यांनी २०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करून या प्रकरणात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली होती.

सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह ७० जणांवर कलम ४२०,५०६, ४०९, ४६५ आणि कलम ४६७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे या गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांची नावं होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER