स्टेट बँकेचे कर्जावरील व्याजदर घटले

- मुदत ठेवींवरही परिणाम होणार

State Bank Of India

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील तसेच देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचे कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या रेपोदरात कपातीनंतर बँकेने हे दर घटवले होतेच. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा व्याज देण्याच्या खर्च दरात अर्धा टक्का कपात करण्यात आली आहे. नवे व्याज दर १० नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

चालू आर्थिक वर्षांत स्टेट बँकेने ‘एमसीएलआर’ आधारित कर्जाच्या व्याजदरांत सातव्यांदा कपात केली आहे. एमसीएलआर हे दर बँकेला कर्ज वाटपासाठी येणाऱ्या खर्चासाठी मानले जातात.

नव्या निर्णयामुळे एक वर्षापर्यंतच्या कर्जावरील ‘एमसीएलआर’चे व्याज दर ८ टक्क्यांपर्यंत खाली येणार आहेत.

अर्थव्यवस्थेतील तरलता लक्षात घेऊन बँकेने मुदत ठेवींवरील व्याज दरांतही बदल केले आहेत. एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.१५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तर, मोठ्या रकमेच्या ठेवींवर ३० ते ७५ बेसिस पॉइंट अर्थात ०.३० ते ०.७५ टक्के कपात केलीय.