मैदानांसाठी शोध मोहीम सुरु

Start the search campaign for grounds to elections Meeting

ठाणे: यापूर्वी निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यात सहज मैदान, रस्ते उपलब्ध होत होती. परंतु आता त्यावर कायदेशीर र्निबध आल्याने मैदान आणि रस्ता सभांसाठी मिळणो मुश्कील झाले आहे. लोकसभा निवडणुकीत सभा घ्यायची कुठे असा प्रश्न शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेला पडला आहे. त्यामुळे निवडणुक विभागात सभांसाठी परवानगी मागण्यासाठीचा एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे सभांच्या तारखासुध्दा मागे पुढे केल्या जात आहेत. त्यातही शिवसेनेकडून शेवटची सभा आपल्याच नेत्याची व्हावी यासाठी गनिमी कावा सुरु आहे. परंतु सभा घ्यायची कुठे मैदान नाही, रस्ता नाही, मग सभा घ्यायची कुठे असा पेच सर्वच पक्षांतील मंडळींना सतावू लागला असून आमच्या नेत्यांना सभा घेण्यासाठी कुणी मैदान देता का मैदान अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दुसरा टप्पा आता अंतिम होत आला असून राज्यातील इतर ठिकाणच्या निवडणुका झाल्यानंतर वरीष्ठ मंडळींकडून 29 एप्रिलला होणा:या मतदानासाठी सभा घेण्याचे नियोजन सुरु आहे. परंतु स्थानिक पातळीवरुन या नेत्यांच्या सभांसाठी ठिकाण कोणते निश्चित करावे असा पेच सध्या सतावू लागला आहे. यापूर्वी सभा घ्यायची झाली तर त्यासाठी सेंट्रल मैदान हे निश्चित मानले जात होते. या मैदानावर यापूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, मायावती आदींसह इतर काही प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या असून त्या गाजल्या सुध्दा आहेत. परंतु मागील काही वर्षापासून सेंट्रल मैदान हे सभांसाठी देण्यात येऊ नये असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. दुसरीकडे गावदेवी मैदानाचा आजूबाजूचा परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे. तर शिवाजी मैदान हे फारच छोटे होत आहे. त्यामुळे सभा घ्यायची झाली तर थेट ढोकाळी येथील हायलॅन्ड भागात परंतु ते ठिकाण शहरापासून आडबाजूला असल्याने त्याठिकाणी सभा घेण्यास प्रमुख पक्ष टाळाटाळ करीत आहेत.

त्यात मागील ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस गडकरी रंगायतन समोरील रस्त्यांवर विविध नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. परंतु त्यानंतर आता या निवडणुकीत वाहतुक कोंडी होत असल्याचे सांगण्यात आल्याने रस्त्यांवर सभा घेण्यासही मज्जव करण्यात आला आहे. त्यामुळे आता सभा घ्यायची कुठे असा पेच या मंडळींना सतावू लागला आहे.

त्यामुळे सभांसाठी ठिकाण कोणते घ्यावे, कोणत्या ठिकाणी सभा घेतल्यास कार्यकर्ते जास्तीच्या संख्येने गर्दी करु शकतात अशा मध्यवर्ती ठिकाणाचा शोध सुरु झाला आहे.