ग्रामसभा सुरू करा : शेट्टी यांची मुश्रीफ यांच्याकडे मागणी

Kolhapur

कोल्हापूर : राज्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होऊन सर्वत्र लॉकडाऊन खुले झाले असून जवळपास सर्वच कार्यक्रम सुरू आहेत. धार्मिक, सांस्कृतिक, लग्न आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शाळा, कॉलेजना देखील परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, ग्रामपंचायतींना अद्यापही ग्रामसभा, तसेच मासिक बैठका घेण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सर्वच ग्रामपंचायतींना या कायद्यांच्या विरोधात ठराव करायचे आहे. त्यातून परिस्थितीची दाहकता केंद्र सरकारपर्यंत जाईल, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज केली.

गावातील ग्रामसभा हे लोकशाहीचे मंदिर लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सुरू आहे. गावातील ग्रामसभा हे तेथील लोकशाहीचे मंदिर आहे. गावांमधील अनेक निर्णय प्रलंबित आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास परवानगी मिळणे अत्यावश्यक आहे. सध्या राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा, जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या सभा, विविध पक्षांचे संपर्क दौरे, थिएटर आदी गोष्टींना परवानगी दिलेली आहे. केंद्र सरकारने शेतकर्‍यांवर लादलेले कृषी कायदे त्वरित मागे घेण्यासाठी शेतकरी ठराव करून आपल्या भावना राष्ट्रपतींकडे पाठवणार आहेत, त्यामुळे या ग्रामसभासुद्धा सुरू व्हाव्यात, असेही शेट्टी म्हणाले. मंत्री मुश्रीफ यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या भावना समजून सकारात्मक प्रतिसाद देत येत्या मंगळवारी ग्रामसभा घेण्याबाबतच्या परवानगीचा आदेश काढणार असल्याचे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER