तटकरे राष्ट्रवादीचे नेते, त्यांचा मानसन्मान राखा; जयंत पाटलांनी शिवसेना आमदाराला सुनावले

Sunil tatkare-Yogesh Kadam-Jayant patil

रत्नागिरी : जनतेने निवडून दिलेल्या खासदारांना कुठेही जाऊन आढावा घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे खासदार सुनील तटकरे ( Sunil-tatkare) यांनी घेतलेल्या बैठकीवर आक्षेप घेण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखून राहिले पाहिजे. हक्कभंगापर्यंत जाण्याची गरज नव्हती. तटकरे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मानसन्मान राखलाच पहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तटकरेंची पाठराखण करत शिवसेनेचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांना खडे बोल सुनावले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम या महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांमध्ये काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. तटकरे खेड, दापोली तालुक्‍यात येऊन स्थानिक आमदार म्हणून कोणत्याही विकासकामांच्या उद्‌घाटनात मला निमंत्रित करत नाहीत, असा आक्षेप घेत तटकरे यांच्या विरोधात कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे. यावरून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तणाताणी झाली होती. अजूनही हा विषय धुमसत आहे.

यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, खासदार म्हणून सुनील तटकरे यांना आढावा बैठक घेण्याचा अधिकार आहे. स्थानिक लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. मीदेखील कधी खासदारांनी आढावा घेतल्यास त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे हा विषय अधिक टोकावर नेण्याची गरज नाही. आपल्या मर्यादा आपण ओळखून राहिले पाहिजे. बैठका घेणे गैर नाही. सुनील तटकरे यांचा मानसन्मान राखणे आवश्‍यक आहे, असे म्हणत त्यांनी कदम यांना सुनावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER