थकीत वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोष आंदोलन

Strike

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने कोरोना काळातील इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन दिले. मात्र, गेली तीन महिने एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. सानुग्रह अनुदान, महागाई भत्ता तसेच वैद्यकीय दयेयकं चार वर्षापासून प्रलंबित आहेत. थकीत वेतनाचे पैसे दिवाळीपूर्वी मिळावेत यामागणीसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेतर्फे सीबीएस परिसरातील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ सोमवारी आक्रोष आंदोलन करण्यात आले.

कोरोनामुळे मृत झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांची मदत द्या, सक्तीची २० दिवसांची रजा रद्द करा, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील थकीत वेतन द्या, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता आणि सण उचल द्या, वाढीव महागाई भत्त्याचा फरक द्या, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे करार फरक रक्कम आणि रजेचा पगाराची बाकी द्या, रोजंदारी कर्मचारी गट क्रमांक एक आणि दोन यांचा वापर करा, आदी मागण्या करण्यात आल्या. एसटी महामंडळासह सार्वजानिक वाहतुक व्यवस्था तोट्यात आहे. महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे.

एसटीची सेवा ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची आहे. ही सुरळीत चालण्यासाठी महामंडळ शासनाकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी तानाजी पाटील यांनी यावेळी केली. अनेक पदाधिकाऱ्यांनी घराच्या दारात उभे राहून वेतनासाठी आक्रोष आंदोलन केल्याची माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील आणि सचिव वसंत पाटील यांनी दिली. यावेळी कोल्हापूर, संभाजीनगर, कागल, गडहिंग्लज, चंदगड, कुरूंदवाड, गारगोटी, राधानगरी, गगनबावडा, मलकापूर, आजरा, इचलकरंजी आगार, विभागीय कार्यालय, गोकुळ शिरगाव टायर प्लॅन्ट येथील कर्मचारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER