SSC HSC Exam 2021: सर्व विद्यार्थ्यांना कोरोना लस द्या; शिवसेनेची मागणी

नवी दिल्ली :- गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा (Corona Vaccination) दुसरा टप्पा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दहावी-बारावीच्या (SSC HSC Exam 2021) परीक्षा ऑफलाइनच होणार, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा शिवसेनेने लोकसभेत मांडला. एप्रिल महिन्यात सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करावी, अशी मागणी शिवसेनेने (Shivsena) केली आहे.

यावर्षी राज्यातून दहावीसाठी १३ लाख तर बारावीसाठी १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. याशिवाय आयसीएसईसाठी (ICSE) १२ हजार तर आयएससीसाठी (ISC) २३ हजार विद्यार्थी बसणार आहेत. तसेच CBSCच्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.

निर्देश देण्याची विनंती

लोकसभेच्या शून्य प्रहरात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत केंद्राने सर्व राज्यांना तातडीने निर्देश द्यावेत, अशी विनंती राहुल शेवाळे यांनी केली. “परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता सर्व पालकांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना लस दिली, तर विद्यार्थी आणि पालक निर्धास्त होतील. परीक्षेवेळी उपस्थित राहणारे शिक्षक आणि कर्मचारी यांनाही लस देण्याची गरज आहे. तातडीने ही प्रक्रिया सुरू करावी. जेणेकरून परीक्षा सुरू होण्याआधी ती पूर्ण होतील.” असे शेवाळे म्हणाले.

कोरोना संसर्गाचा वेग

कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनावर मत करण्यासाठी काही ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत वाढ होत असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५३ हजार ४७६ नवे रुग्ण आढळले. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून, एकूण रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ इतकी पोहोचली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना होम सेंटर किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेत परीक्षेची व्यवस्था करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER