दहशतवादी हल्ल्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंचा पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्यास नकार

- श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांचे फवाद हुसेन यांना उत्तर

Sri Lankan players refuse to travel to Pakistan due to terrorist attacks

श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला. भारताच्या दबावामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला हा पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसेन यांचा आरोप निराधार आहे, असे श्रीलंकेचे क्रीडामंत्री हरीन फर्नांडो यांनी म्हटले आहे.


कोलंबो : श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला. भारताच्या दबावामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला हा पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसेन यांचा आरोप निराधार आहे, असे श्रीलंकेचे क्रीडामंत्री हरीन फर्नांडो यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेच्या वरिष्ठ खेळाडूंनी पाकिस्तनच्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या मानहानीमुळे वैतागलेल्या पाकिस्तानने यासाठीही भारताला जबाबदार धरले होते. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसेन यांनी आरोप केला होता की, “पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ नका असं भारताकडून श्रीलंकन खेळाडूंना सांगितले जात आहे. तुम्ही पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली नाहीत, तर तुमची आयपीएल मधून हकालपट्टी केली जाईल, असं त्या खेळाडूंना धमकावण्यात आले असल्याचे क्रीडा समालोचकांकडून मला समजले आहे. हे खूपच खेदजनक आहे. क्रीडा विभागापासून ते अंतराळ क्षेत्रातील स्पर्धेपर्यंत भारताच्या जळाऊवृत्तीचा निषेध केलाच पाहिजे. भारतीय क्रीडा विभागाची ही वागणुक अत्यंत चुकीच्या प्रकारची आहे”.

त्यानंतर, श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हरीन फर्नांडो यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले “या अहवालांमध्ये कोणतेही तथ्य नाही. भारताकडून श्रीलंकेच्या खेळाडूंवर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. 2009 च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या भावनांचा सन्मान करून आम्ही त्यांना संघात सामिल केले नाही. आमचा संघ पाकिस्तानमध्ये जाऊनच पाकिस्तानी संघाचा पराभव करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

लसिथ मलिंगा, अँजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल या खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2015 आणि 2018 मध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या संघांशिवाय कोणत्याही संघांनी पाकिस्तानचा दौरा केलेला नाही, हे उल्लेखनीय.