भक्कम गोलंदाजी आज सनरायझर्स तारेल का?

Maharashtra Today

गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये (IPL). सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने चांगली कामगिरी करत एलिमिनेटर फेरीपर्यंत धडक मारली होती पण कोलकाता नाईट रायडर्सविरुध्दचे (KKR) दोन्ही सामने त्यांनी गमावले होते.आता हे दोन्ही संघ चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रविवारी समोरासमोर येत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघांचे कर्णधार विदेशी आहेत.केकेआरची धुरा विश्वविजेता इंग्लिश कर्णधार ओईन माॕर्गनकडे आहे तर एसआरएचचे नेतृत्व धडाकेबाज आॕस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वाॕर्नरकडे आहे.

गेल्यावर्षी मध्येच अचानक माॕर्गनकडे केकेआरची धुरा आली होती. त्यामुळे तो काहीसा गोंधळलेला होता तरीसुध्दा त्यांनी चांगली कामगिरी केली होती आणि केवळ नेट रनरेटवर त्यांची प्ले आॕफ फेरी हुकली होती. योगायोगाने त्यावेळी सनरायझर्सनेच त्यांच्यावर नेट रनरेटमध्ये बाजी मारली होती. आता यंदा सुरुवातीपासूनच तो कर्णधार असल्याने त्याने रणनिती ठरवलेली असणार. शकिब अल हसन व आंद्रे रसेलकडून केकेआरला मोठ्या अपेक्षा असतील. सुनील नरीन,नितीश राणा व शुभमन गिल यांच्याकडून फलंदाजीत तर गोलंदाजीत पॕट कमिन्स व प्रसिध्द कृष्ण हे नवा चेंडू हातळतील तर शकिब अल हसन व वरुण चक्रवर्ती यांची फिरकी चेपॉकच्या खेळपट्टीवर किती प्रभावी ठरते हा उत्सुकतेचा विषय आहे.

सनरायझर्सची ताकद ही त्यांची भक्कम गोलंदाजी असेल. भूवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा यांच्यासह रशिद खानसारखे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. फलंदाजीत डेव्हिड वाॕर्नरशिवाय केन विल्यम्सन, जेसन होल्डर त्यांच्याकडे आहेत. यापैकी सर्वच खेळतात की कोणकोण खेळतात याची उत्सुकता आहे. पण गोलंदाजीमुळे सनरायझर्सची बाजू वरचढ आहे.

या दोन संघात आतापर्यंत 19 लढती झाल्या असून त्यातील 12 लढती केकेआरने जिंकल्या आहेत. पाठलाग करताना केकेआरने 7 लढती जिंकल्या तर फक्त तीन गमावल्या आहेत. प्रथम फलंदाजीतही केकेआर 5-4 असे पुढे आहे. गेल्या पाच लढतीत केकेआरने तीन लढती जिंकल्या आहेत.

सर्वोच्च खेळी

डेव्हिड वाॕर्नर – 126 व 91
गौतम गंभीर- 90

सर्वोत्तम गोलंदाजी

प्रसिध्द कृष्ण – 4/ 30
कर्ण शर्मा – 4/ 38

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button