ठाकरे सरकार आणि शरद पवारांतर्फे राहुल गांधींची उडवाउडवी : किरीट सोमय्या

Sharad Pawar-Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या उडवाउडवी चालविली आहे, या शब्दांत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज रविवारी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याच्या राहुल गांधींच्या आश्वासनाची ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांतर्फे थट्टा सुरू असल्याची टीका सोमय्या यांनी आज एका ट्विटमधून केली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी झोपडपट्टीवासीयांना ५०० चौरस फुटांची घरे देण्याचे आश्वासन दिले होते. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातही त्याचा समावेश आहे, हे विशेष. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. आता, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) ३०० वा ५०० चौरस फुटांची घरे दिली, तर पायाभूत सुविधांवर किती ताण पडेल, याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली आहे. या समितीच्या अहवालानंतरच घरांच्या क्षेत्रफळाबाबत अंतिम निर्णय होईल, असे आव्हाड यांनी म्हटलेले आहे. भाजपा नेते सोमय्या यांनी नेमके यावरच बोट ठेवले आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ५०० चौरस फुटांचे घर देण्याची मागणी केलेली आहे. सोमय्या यांनी या सार्‍या प्रकाराला ‘अशी ही बनवाबनवी’ आणि ‘अशी ही उडवाउडवी’ म्हणत जोरदार टोला लगावला आहे.