स्क्वॅशला ऑलिम्पिकमध्ये स्थान का नाही?- दीपिका पल्लीकलचा सवाल

Squash should be in Olympics, Dipika Pallikal

ऑलिम्पिक हा खेळांचा महाकुंभ मानला जातो मात्र त्यात काही खेळांना स्थान आहे आणि काही खेळांना नाही. ऑलिम्पिकमध्ये असणारे काही खेळ तर आश्चर्य वाटावे असे आहेत, पण स्क्वॅशसारख्या खेळाला ऑलिम्पिकमध्ये स्थान का नाही, असा सवाल या खेळातील यशस्वी भारतीय खेळाडू दीपिका पल्लीकल हिने केला आहे. ती स्क्वॅशमधील राष्ट्रकूल व आशियाड पदकविजेती आहे.

आपल्याला भविष्यातही स्क्वॅशचे चांगले खेळाडू घडवायचे असतील तर देशात ज्याप्रकारे स्क्वॅशचा कारभार चाललाय त्याचा फेरविचार करणे गरजेचे आहे असे तिने म्हटले आहे.

ऑलिम्पिकमध्ये स्क्वॅश नसणे हे या खेळाचे नाही तर ऑलिम्पिकचे नुकसान असल्याचे धाडसी विधानही तिने केले आहे. 2024 च्या पॕरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याचे स्क्वॅशने प्रयत्न चालवले होते पण त्यांना त्यात अपयश आले. दीपिकासारखीच भावना या खेळाच्या इतर खेळाडूंचीसुध्दा आहे.

पॕरिस 2024 ऑलिम्पिकसाठी स्क्वॅशला स्थान मिळाले नसले तरी ब्रेकडान्सिंग, सर्फिंग, क्लायम्बिंग आणि स्केटबोर्डिंगसारख्या खेळांना मात्र स्थान देण्यात आले आहे. यापूर्वीसुध्दा लंडन, रियो आणि टोकियो आॕलिम्पिकवेळी स्क्वॅशने आॕलिम्पिकचा दरवाजा ठोठावला होता पण प्रत्येक वेळी त्यांना अपयशच आले. मात्र ऑलिम्पिकसाठीच्या या प्रयत्नांनी स्क्वॅशमध्ये काही चांगले बदल मात्र घडवून आणले आहेत.

दीपिका म्हणते की, ऑलिम्पिकमधील काही खेळ बघून हसू येते. जर ते खेळ ऑलिम्पिकचा भाग बनू शकतात तर स्क्वॅशश तर नक्कीच ऑलिम्पिकमध्ये असायला हवे, परंतु तसे झाले नसले तरी या प्रयत्नांनी खेळाची लक्षणीय प्रगती झाली आहे. त्यानिमित्ताने आम्ही आमचे काम आणि गृहपाठ केला आहे.

दीपिकाने ग्लासगोच्या राष्ट्रकूल सामन्यांमध्ये दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले आहे.त्यानंतर 2018 च्या गोल्डकोस्ट राष्ट्रकूल सामन्यांमध्येही तिने यश मिळवले होते आणि आशियाडमध्ये दोन रौप्यपदके जिंकली होती.

दीपिकासह सौरव घोषाल व ज्योत्स्ना चिनाप्पा यांनी देशाला स्क्वॅशमध्ये उल्लेखनीय यश मिळवून दिले आहे तरी देशातील स्क्वॅशच्या कारभारात सुधारणेची गरज आहे असे तिला वाटते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नेमणे ही सर्वात पहिली गरज आहे असे तिला वाटते. इजिप्तचे अश्रफ करार्गी हे 2018 च्या राष्ट्रकूल सामन्यांपर्यंत प्रशिक्षक होते मात्र तेंव्हापासून आपल्याकडे स्क्वॅशसाठी पूर्णवेळ प्रशिक्षक नेमलेला नाही.आपण स्वतः, घोषाल आणि ज्योत्स्ना, स्वतःच्या प्रयत्नांनी परदेशात सुदैवाने प्रशिक्षण घेऊ शकलो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलो पण देशात या खेळाला पुढे न्यायचे असेल तर स्थिती बदलण्याची गरज आहे.

ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले तर निश्चितच स्क्वॅश लोकप्रियतेत भर पडेल.कारण ऑलिम्पिक खेळांना देशात वेगळाच दर्जा आहे, शिवाय या खेळाला सरकारी मदतही मिळेल, प्रायोजकसुध्दा पुढे येतील आणि बऱ्याच गोष्टी घडतील असे या 28 वर्षीय खेळाडूला वाटते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER