बोंबीलसोबत स्पृहाने जागवल्या खरपूस आठवणी

spruha joshi - Maharastra today

खरं तर प्रत्येक व्यक्ती ही तिच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारण्यासाठी कधीही आणि कुठेही तयार असते. कलाकारांनाही त्यांच्या आवडीचे पदार्थ फस्त करायला आवडत असतात; पण अनेकदा फिटनेस आणि डाएट या सगळ्यांच्या वेळा आणि तऱ्हा सांभाळत असताना समोर आवडीचा पदार्थ आला तरी तो न खाण्यासाठी मनावर संयम ठेवावा लागतो. पण शेवटी कलाकारदेखील माणूसच असतात आणि आपण सेलिब्रिटी आहोत, आपल्याला डायट सांभाळायचा आहे या सगळ्याला फाट्यावर मारत ही कलाकार मंडळी त्यांच्या आवडीच्या पदार्थावर ताव मारण्याची आयती आलेली संधी सोडत नाहीत. अभिनेत्री स्पृहा जोशी हिनेही तिच्या आवडीच्या बोंबीलवर असाच ताव मारला आणि बोंबीलसोबत तिच्या बालपणातल्या खमंग आठवणीही तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.

खरे तर स्पृहाने बोंबील भाजून ते खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ते बोंबील एका सीनसाठी सेटवर आणले होते; पण जेव्हा सीन संपला त्यानंतर मात्र ते बोंबील घेऊन ती तडक सेटवर असलेल्या किचनमध्ये पोहचली आणि त्या ठिकाणी तिने बोंबील खरपूस भाजले आणि स्वाहा म्हटलं. स्पृहा जोशी ही सध्या अलिबाग येथे शूटिंग करत आहे. या शूटिंगमध्ये एका सीनसाठी बोंबील मागवण्यात आले होते. सीन करत असल्यापासूनच स्पृहाचं लक्ष त्या बोंबीलकडे होतं. पण जोपर्यंत सीन संपत नाही तोपर्यंत काही आपल्याला बोंबील मिळणार नाही अशी तिने समजूत काढून घेतली. जेव्हा सीन संपला तेव्हा मात्र तिला अजिबात राहवलं नाही आणि तडक ती बोंबीलची प्लेट घेऊन सेटवर असलेल्या किचनमध्ये गेली. त्या ठिकाणी तिने ते बोंबील मस्तपैकी भाजले. त्याच्यावर तिखट, मीठ आणि लिंबू पिळला आणि मग मात्र सेटवरच्या सगळ्या सहकलाकारांबरोबर स्पृहाने बोंबील फस्त केले. पुणेकर मुलगी असली तरी मासे हा तिचा आवडीचा प्रांत आहे. हे बोंबील खात असतानाच तिने तिच्या लहानपणाची एक खास आठवणदेखील शेअर केली आहे.

स्पृहा सांगते, लहानपणी आई , मी आणि बहीण क्षिप्रा असेच बोंबील फक्त गॅसवर खरपूस भाजायचो आणि त्याला तिखट-मीठ लावून त्यावर लिंबू पिळून खायचो. दिवसभरातल्या कुठल्याही वेळेत भूक लागली की पोटपूजेसाठी आमच्या घरात हा मेन्यू नेहमीच ऑल टाइम हिट असायचा. अलिबागमध्ये शूटिंगच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून मच्छीवर ताव मारणे सुरूच आहे. शूटिंगच्या निमित्ताने अलिबागला जायला मिळणार हे कळल्यापासूनच मला जो आनंद झाला होता तो त्या ठिकाणी भरपूर मासे खायला मिळणार याचा होता. मी तो आनंद मनसोक्त जगत आहे. मच्छी प्रकारातील बोंबील हा प्रकार मला जास्त आवडतो. एक तर बोंबील फक्त भाजून खाण्याची मजा औरच आहे. अशी मजा करी किंवा फ्राय मच्छीमध्ये नाही. त्यामुळे पाच ते दहा मिनिटांत बोंबील भाजून होतात. ते खरपूस भाजलेले बोंबील लावल्यानंतर खूपच अप्रतिम लागतात. मी लहानपणापासून बोंबील खात आल्यामुळे आणि त्यात अलिबागचे बोंबील हे प्रचंड चविष्ट असल्यामुळे सीन संपल्या-संपल्या मी माझी ही हौस भागवून घेतली. स्पृहा सध्या अलिबागमध्ये शूटिंग करण्याबरोबरच ‘सूर नवा ध्यास नवा’ या रियालिटी शोमधील महिला विशेष या पर्वाचे सूत्रसंचालनदेखील करत आहे.

नुकताच तिला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक हा पुरस्कारही मिळाला आहे. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकेत स्पृहाची प्रमुख भूमिका होती तर त्यापूर्वी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत स्वप्निल जोशीच्या बहिणीची भूमिका केली होती. मला काहीच प्रॉब्लेम नाही , वेलकम होम, बाबा, होम स्वीट होम, विकी वेलिंगकर, पेइंग घोस्ट या सिनेमातील स्पृहाचा अभिनय तिच्या चाहत्यांना विशेष आवडला होता. अभिनयासोबत कवयित्री म्हणूनदेखील स्पृहा जोशीची विशेष ओळख आहे. ‘लोपामुद्रा’ या नावाने ती सतत सोशल मीडियावर वेगवेगळ्या कविता आणि साहित्यिक विषय पोस्ट शेअर करत असते .स्पृहाचे ‘चांदणचुरा’ आणि ‘लोपामुद्रा’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. सिनेमा, नाटक आणि मालिका या तीनही क्षेत्रांमधील एक संवेदनशील आणि मोजकं पण नेटकं काम करणारी अभिनेत्री अशी स्पृहाची ओळख आहे. आता बोंबीलप्रेमी स्पृहा अशी ओळख तयार झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button