अंकुरित / मोड आलेले धान्य : किती योग्य वा अयोग्य ?

अंकुरीत -- मोड आलेले धान्य

आजकाल अंकुरित वा मोड (Sprouted Grain) आलेले कडधान्य खाल्लेच पाहिजे हा पगडा इतका प्रभावी झाला आहे की, कुणी वैद्याने सांगितले की, मोड आलेले धान्य खाऊ नका तर लगेच भुवया उंचावतात. मोड आलेले तर healthy असते, असे बोल्ड अक्षरात आपल्या डोक्यात पक्के बसले आहे. मटकी-मूग-चणे आजकाल भाजीवाल्याकडेसुद्धा तयारच मिळतात. पण खरंच हे योग्य नाहीय का ? आयुर्वेदशास्त्र (Ayurveda) याबद्दल काय सांगते ?

अंकुरित धान्य वा मोड आलेले धान्य यालाच आयुर्वेदात ‘विरूढ’ अशी संज्ञा आली आहे. विरूढ म्हणजेच अंकुरित धान्य आपल्या शरीरावर काय प्रभाव टाकते हे सांगताना सुश्रुताचार्य म्हणतात :

विदाही गुरु विष्टम्भि विरुढं द्रष्टिदूषणम् ।

अंकुरित धान्य विदाह म्हणजेच जळजळ निर्माण करणारे, पचायला जड, विष्टंभी म्हणजेच बद्धकोष्ठता निर्माण करणारे तसेच दृष्टीकरिता हानीकर आहे. इतका आरोग्यघातक परिणाम या अंकुरित धान्याचा आपल्या शरीरावर होत असतो.

आहाराचे पचन उशिरा  होणे वा न होणे हे अनेक रोगांचे मूळ कारण आहे. अतिसार, मूळव्याध, पांडू, अंगावर सूज येणे अशा कितीतरी व्याधींचे मूळ कारण जड अन्न अंकुरित कडधान्य यांचे सतत व अति प्रमाण जेवणात असणे हे दिसून येते. यामुळे पचनशक्ती कमी होते.  जळजळ, बद्धकोष्ठता निर्माण होते व हळूहळू मोठ्या व्याधीत त्याचे परावर्तन झालेले दिसून येते. मधुमेह, गाऊट, युरीक अॅसिडसारखे आजार होऊ शकतात.

चरकाचार्यांनी ग्राम्याहार म्हणजेच असा आहार ज्याने लगेच शरीरावर परिणाम दिसत नाही; परंतु हळूहळू कालांतराने मोठे आजार निर्माण होऊ शकतात.  अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यात अंकुरित धान्याचे अधिक व नियमित सेवन हेसुद्धा समाविष्ट आहे. इतका मोठा प्रभाव  पचनावर करणारे अंकुरित कडधान्य आहेत.

कोणताही आहार कितीही पौष्टिक असला तरीही तो पचायला जड असेल, व्यक्तीची पाचन शक्तीच कमी असेल तर तो आहार शरीर उपयोगी ठरतच नाही. उलट आजारच निर्माण करेल. विरूढ धान्य त्यापैकी एक आहे.

मग कडधान्य कशी खावीत ? कडधान्य भिजवून अंकुरित न करता शिजवावी. आपल्या पाचन शक्तिनुसार सूप, धिरडे, उसळ भाजी याप्रमाणे करता येतील. कच्ची तर मुळीच खाऊ नये. जे नियमित व्यायाम करतात, तरुण वय पाचनशक्ती  उत्तम असलेले मैदानी खेळ खेळणारे यांनी कडधान्य घेतले तर त्यांना पचतीलही; पण बाल, वृद्ध, गर्भिणी, आजारी पाचनविकार पाचनशक्ती कमी असणारे यांनी तर मोड आलेले कडधान्य मुळीच घेऊ नये. मूग, मसूर, मटकी ही त्यातल्या त्यात हलकी सुपाच्य कडधान्य आहेत.

आपल्याकडे विदेशातील रीसर्च आणि न्यूट्रीशनचा इतका पगडा होत आहे की आपल्या देशात आपल्या प्रकृतीला तिकडल्या गोष्टी मानवणार नाही हा विचारच आपण करत नाही. विरूढ धान्य हा आयुर्वेदाचा शास्त्रोक्त विचार आपल्याकडे सांगितला आहे.  त्याचे परिणाम पण शरीरावर दिसत आहेत. त्यामुळे हे आप्तवचन नक्कीच समजून घेणे गरजेचे आहे.

ही बातमी पण वाचा :

ayurveda

 

 

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER