
व्यावसायिक क्रीडाजगताने आतापर्यंत बऱ्याच संकटांवर मात केली आहे. 9/11 चा दहशतवादी हल्ला असो, आर्थिक मंदी असो, नैसर्गिक आपत्ती असो की युध्द असो, क्रीडाविश्वाने पुन्हा पुन्हा मुसंडी मारली आहे. पण सद्यस्थितीत जे कोरोना महामारीचे संकट आले आहे ते वेगळेच आहे आणि त्याचा परिणाम क्रीडाविश्वातील आर्थिक घडामोडींवर स्पष्ट दिसुन येत आहे.
प्रतिष्ठित अर्थविषयक नियतकालीक ‘फोर्बस्’ ने शुक्रवारी जाहीर केलेल्या गेल्या वर्षभरात सर्वाधिक कमाई केलेल्या आघाडीच्या 100 खेळाडूंच्या यादीत त्याचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे. 1 जून 2019 ते 31 मे 2020 दरम्यान खेळाडूंच्या मानधन, वेतन, जाहिराती आणि प्रायोजकत्वातून झालेल्या कमाईच्या आधारे ही यादी बनविण्यात आली आहे. त्यावर कोरोनामुळे क्रीडाविश्व यंदा मार्चपासून ठप्प पडल्याचा स्पष्ट परिणाम दिसत आहे.
फोर्बसच्या अभ्यासानुसार यंदाच्या सर्वाधिक कमाईच्या पहिल्या 100 खेळाडूंची एकत्रित कमाई 3.6 अब्ज डॉलर आहे. गेल्यावर्षीपेक्षा ही कमाई 9 टक्क्यांनी घटली आहे. 2020 च्या यादीतील शेवटचा 100 व्या क्रमांकाच्या खेळाडूची कमाई (कट ऑफ) 2 कोटी 18 लाख डॉलरवर आली आहे. हीच कमाई (कट ऑफ) 2019 मध्ये 2 कोटी 50 लाख डॉलरची होती. यावरुन कोरोना या जागतिक महामारीने हे सिध्द केले आहे की, ज्यावेळी अर्थव्यवस्था ढासळते, त्यावेळी जगातील धनाढ्य खेळाडूंनाही नुकसान पोहोचते असे फोर्बसचे ज्येष्ठ संपादक बादेनहौसेन यांनी म्हटले आहे. त्यांच्या अभ्यासानुसार गेल्या दशकभरात खेळाडूंचे वेतन व प्रायोजकत्वाचे करार गगनाला भिडले होते पण आता कोरोनामुळे बहुतांश खेळांच्या व्यावसायिक लिग व कंपन्यांचे उत्पन्न घटणार असल्याने या वेतन व करारात मोठी घसरण होणार आहे. अजुनही कोरोनामुळे अनिश्चितता कायम असल्याने आणि खेळ पूर्ववत कधी सुरू होतील हे स्पष्ट नसल्याने पुढील वर्षी हे आकडे आणखी घसरतील असा अंदाज आहे.
यंदाच्या टॉप 100 मध्ये 21 देशांचे आणि 9 वेगवेगळ्या खेळांचे खेळाडू आहेत. यंदाच्या घसरणीच्या या ट्रेंडला अमेरिकन फूटबॉल अपवाद ठरला आहे. एकतर टॉप 100 मध्ये या खेळाचे खेळाडूसुध्दा 19 वरुन 31 पर्यंत वाढले आहेत शिवाय टॉप 100 मधील अमेरिकन फूटबॉलपटूंची एकत्रित कमाईसुध्दा 77 कोटी 30 लाख डॉलरवरुन 92 कोटी 60 लाख डॉलरपर्यंत वाढली आहे. टेनिसपटूंच्या कमाईतही 5 कोटी 10 लाख डॉलरची वाढ झाली आहे.
बेसबॉललला सर्वाधिक फटका बसला आहे. 2019 मध्ये त्यांचे 15 खेळाडू टॉप 100 मध्ये होते. यंदा फक्त एकच बेसबॉललपटू आहे. साहजिकच एकत्रित कमाईसुध्दा 46 कोटी 80 लाख डॉलरवरुन फक्त दोन कोटी 70 लाख डॉलरवर आली आहे.
- सर्वाधिक कमाई असलेले टॉप 100 खेळाडू (स्रोत: फोर्बस)
खेळ ——— खेळाडू (2020) — खेळाडू (2019)
बास्केटबॉलल —– 35 —————– 35
अमे. फूटबॉल — 31 —————– 19
फूटबॉल ———- 14 —————– 12
टेनिस ————- 06 —————– 05
बॉक्सिंग ———- 05 —————– 06
गोल्फ ————- 04 —————– 05
रेसिंग ————– 03 —————– 02
बेसबॉलल ———– 01 —————– 15
क्रिकेट ————- 01 —————– 01
- खेळनिहाय एकत्रित कमाई – अमे.डॉलर (स्रोत: फोर्बस)
खेळ ———– (2020) ——— (2019)
बास्केटबॉलल —– 102 कोटी————103 कोटी
अमे. फूटबॉल — 92.6 कोटी ———-77.3 कोटी
फूटबॉल ———- 61.3 कोटी———- 60.7 कोटी
टेनिस ————- 29.6 कोटी ——— 24.5 कोटी
बॉक्सिंग ———- 23.6 कोटी ——— 27.8 कोटी
गोल्फ ————- 18.3 कोटी———- 21.5 कोटी
रेसिंग ————– 11.9 कोटी ——— 9.5 कोटी
बेसबॉलल ———– 2.7 कोटी———– 46.8 कोटी
क्रिकेट ————- 2.6 कोटी ———- 2.5 कोटी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला