विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ जाहीर

sport news

ओदिशाची राजधानी भूवनेश्वर येथे २८ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा १८ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. मनप्रीतसिंगकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली असून चिंग्लेनसना सिंग कांगुजम हा उपकर्णधार आहे. पी.आर. श्रीजेश व कृष्ण बहादूर पाठक हे गोलरक्षक आहेत. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना २८ रोजीच दक्षिण आफ्रिकेविरुध्द आहे.

आशिया चॕम्पियन्स ट्रॉफीला मुकलेल्या डिफेंडर बिरेंद्र लाक्रा याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्याशिवाय भारताच्या बचाव फळीत अमीत रोहिदास, सुरेंद्र कुमार, कोथाजीतसिंग, हरमनप्रीतसिंग आणि वरुण कुमार यांचा समावेश आहे.

मिडफिल्डमध्ये कर्णधार मनप्रीत व उपकर्णधार कांगुजाम या अनुभवी जोडीवर खरी मदार असेल. आघाडी फळीत चॕम्पियन्स आशिया चषक गाजवणारा आकाशदीपसिंग मुख्य असेल.

कलिंगा स्टेडियमवर या विश्वचषकाचेसामने होणार आहेत. त्यासाठी यजमान भारताचा ‘क’ गटात समावेश करण्यात आला असून बेल्जियम, कॕनडा आणि दक्षिण आफ्रिकासुध्दा याच गटात आहेत. गटातील विजेत्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळणार आहे.

निवडलेल्या संघाबद्दल मुख्य प्रशिक्षक हरेंद्रसिंग म्हणाले की, उपलब्ध ३४ खेळाडूंमधून आम्ही सर्वोत्तम १८ खेळाडू निवडले आहेत. हा संघ म्हणजे अनुभवी व युवा खेळाडूंचा उत्तम समन्वय आहे ज्यांना त्यांचा सध्याचा फॉर्म आणि फिटनेसच्या आधारावर निवडण्यात आले आहे.

भारतीय संघासाठीचे संभाव्य सर्व ३४ खेळाडू 23 नोव्हेंबरपर्यंत एकत्रित सराव करतील.

भारतीय संघ असा-

गोलरक्षक- पी.आर. श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक.

डिफेंडर- हरमनप्रीतसिंग, बिरेंद्र लाक्रा, वरूणकुमार, कोथाजीतसिंग, सुरेंद्रकुमार, अमीत रोहिदास

मिडफिल्डर- मानप्रीतसिंग (कर्णधार), चिंगलेन्सनासिंग कांगुजाम (उपकर्णधार), निळकंठ शर्मा, हार्दिकसिंग, सुमीत

फॉरवर्ड- आकाशदीपसिंग, मनदीपसिंग, दिलप्रीतसिंग, ललितकुमार उपाध्याय, सिमरनजीतसिंग