कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती द्या – डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

Nitin Raut

नागपूर : जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेतील उत्तम समन्वयाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णवाढीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. यापुढील पावसाळ्याच्या काळात आरोग्य यंत्रणेने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आदी उपस्थित होते.

पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने कोरोनासंबंधी उपाययोजना राबविताना केलेल्या तयारीचा आढावा घेताना खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचार करण्याबाबत असलेल्या मार्गदर्शक तत्वाचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, याबाबतची अद्ययावत माहिती सर्व संबंधित यंत्रणांनी ठेवावी. सोबतच कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांना वगळले असले तरीही कोरोनाबाधित रुग्णांसह इतर रुग्णही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी सूट देण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी दिले.

शासकीय वैद्यकीय रुग्णालये व महानगरपालिकेची रुग्णालये असली तरीही भविष्यात खासगी रुग्णालये शासकीय दरांमध्ये रुग्णांच्या सेवेत कायम सुरु ठेवण्याची सक्ती करावी. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याची वेळोवेळी खात्री करुन घ्यावी. त्यासाठी जबाबदार अधिकारी नियुक्त करावा. पावसाळ्यात प्रशासनाला महानगरपालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला विशेष तयारी करावी लागणार असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व परिचारिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यासोबतच याचे योग्य नियोजन व तशी संपूर्ण तयारी करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी सांगितले.

बाहेर जिल्ह्यातून किंवा शहरातून ग्रामीण भागात आलेल्या मजुरांना आणि नागरिकांना गावातील शाळेत संस्थात्मक विलगीकरण सक्तीने करण्याचे निर्देश देताना शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी. ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील स्थलांतरीत मजूर, शिधापत्रिकाधारक व शिधापत्रिका नसलेले नागरिकांना पुरेशा प्रमाणात अन्नधान्य पुरवठा याबाबतचे नियोजन करावे, त्याची अद्ययावत माहिती ठेवावी, शिधापत्रिका नसलेल्यांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Source:- Mahasamvad News


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER