
- फक्त एकच बाजू ऐकून दिला अटकपूर्व जामीन
नवी दिल्ली : बलात्काराचा आरोप असलेला गोव्यातील कळंगुट येथील एका उपाहारगृहाचा मालक ज्युड लोबो याच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) एका खंडपीठाने सोमवारी होळीची (Holi) सुट्टी असूनही तातडीने विशेष सुनावणी घेऊन त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
दिल्लीतील एका महिलेने लोबोविरुद्ध भजनपुरा पोलीस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. सत्र न्यायालयाने फेब्रुवारीत सुरुवातीस लोबो यास अटक न करण्याचा तात्पुरता आदेश दिला होता. मात्र नंतर २२ मार्चला सत्र न्यायालयाने व नंतर २६ मार्चला दिल्ली उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. लगेच दुसºया दिवशी २७ मार्चला लोबोने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल केली. एकच दिवस मधे गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्याला सुटीच्या दिवशी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
विशेष म्हणजे न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांनी फक्त लोबोच्या वतीने त्याचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांचे म्हणणे ऐकून त्याला १० हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. हा आदेश दिल्यानंतर आता मूळ फिर्याद करणार्या महिलेस प्रतिवादी करण्यास सांगण्यात आले असून तिला व दिल्ली सरकारला नोटीस काढण्यात आली आहे.
रोहटगी यांनी असा युक्तिवाद केला की, लोबो याच्याविरुद्धची फिर्याद ही एक कपोलकल्पित कथा आहे. सन २००९ मध्ये झालेल्या कथित बलात्काराची फिर्याद या महिलेने आता गेल्या डिसेंबरमध्ये केली आहे.
या महिलेला लोबोच्या हॉटेलमध्ये ५० लोकांसाठी पार्टी आयोजित करायची होती. परंतु कोविडच्या निर्बंधांमुळे लोबोने त्यास नकार दिला. त्याचा राग धरून या महिलेने ही खोटी फिर्याद केली आहे. लोबोने लग्नाच्या आणा-भाका दिल्या, असाही तिचा दावा आहे. पण हेही तद्दन खोटे आहे. कारण लोबो विवाहित असून त्याला दोन तरुण मुले आहेत, असेही रोहटगी यांनी सांगितले. लोबो आणि ही महिला यांनी परस्परांना पाठविलेले व्हॉट्सअॅप मेसेजही त्यांनी न्यायालयास दाखविले.
न्यायाधीशांनी रोहटगी यांचे म्हणणे ऐकले. फिर्यादी महिलेने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये दिलेली जबानी वाचली व लोबोला अटकपूर्व जामीन द्यायला हवा याविषयी आपली खात्री झाल्याचे नमूद केले.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला