“सोसल्याचा सूर होतो “

मध्यंतरी एका छोट्या मुलीची गोष्ट वाचनात आली. तिला पाळणाघरातून संध्याकाळी घरी आणताना तिचे बाबा तिच्याशी गप्पा करत असतं .त्या पाळणाघरातच्या परिसरामध्ये खूप झाडं होती. मोकळे निवांत रस्ते होते ,असा तो सुंदर परिसर. तिथे लिंबाच्या झाडाखाली लिंबोळ्या पडलेल्या असायच्या. मग येताना ,हे काय, ते काय ?याला काय म्हणतात? असे तिचे सतत चालू असायचे.. एक दिवस तिने बाबांना सांगितले,” या लिंबोळ्या असतात. त्या अजिबात खायचे नसतात .विषारी असतात हे तिच्या आईने तिला सांगून ठेवलेलं आहे.”

असंच एकदा परततांना गाडीमध्ये मागे बसलेल्या त्या छोट्या मुलीने सांगणं सुरू केलं , “लिंबोणी असतात ना, त्या मी खाल्ल्या. मग मला उलट्या झाल्या, खू ss प उलट्या झाल्या. मग मला डॉक्टर मावशीकडे नेलं. तिनं मला औषध दिलं. टू च केलं..”तेव्हा आईने मागे वळून बघितलं आणि हसत विचारलं,” केव्हा ग तू बिया खाल्ल्या ?” तर ती गोड मुलगी म्हणाली,”अगं,हे मला माहित होतं ना, म्हणून मी त्या खाल्लेच नाहीत !” असं म्हणून त्या दोघी मायलेकी जोर-जोरात हसल्या.

फ्रेंड्स ! अशी अनेक मुलं वेगवेगळ्या प्रसंगातून अशीच कल्पना लढवून गोष्टी तयार करीत असतात. त्यांची ही अभिव्यक्ती सतत सुरू असते. त्यांच्या आसपास घडणाऱ्या गोष्टी ,ऐकले जाणारे आवाज, भाषा, आकार ,रंग, यांचे ताजे अनुभव ते घेतात .कारण या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन आणि अद्भुतच असतात, आणि त्यामुळे त्यात अस्सलपणा असतो. जसजसं वय वाढतं तसं अनुभवांवर वेगवेगळ्या रंगांची, आवरण येतात . त्यावर काही पूर्वग्रहदूषित पण असतो, काही स्वतःची मतं असतात.

लहान मुलांचं हे कुतूहल हाच त्यांच्या संपूर्ण विकासामधला गुरु असतो. परंतु दुर्दैवाने असे म्हणावे लागते, की मुलांच्या सर्जनशीलतेची हद्द शाळा प्रवेशा पर्यंत थांबते. उलट शिकण्याच्या भडीमारा पासून अशा सर्जनशीलतेला वाचवावें लागते. मुलांना मोकळेपण मिळालं तर चकित करणारी सर्जनशील निर्मिती ते करून दाखवू शकतात .मुलांच्या चित्र प्रदर्शनाला भेट देऊन आल्यानंतर पिकासो एकदा रडला होता अशी दंतकथा आहे. तो म्हणाला, मला इतक्या वर्षात या मुलांसारखी निर्भीड आणि ओरिजिनल चित्र नाही काढता आली…

बरेच आपली मुलं ही शब्दांशी झटापट करता करता कधीतरी अचानक एखादी कविता करतात तर कधी त्यांच्या बालवयात अतिशय विसंगत वाटेल अशा कल्पकतेने एखादं सुंदर चित्र ते काढतात. आणि आपली खात्री पटते की या लेकरा मध्ये सर्जनशीलता उपजतच आहे. पुढे तेच बाळ कदाचित कमी होतं चित्रकार होतं .पण स्वतः बाबत मात्र आपल्याला नेहमीच शंका असते की मला असं सर्जनशीलतेची देणगी मिळाली नाही, किंवा काही माणसांना असंही वाटतं की आपल्याला योग्य संधीच मिळाली नाही. पण तसं काही नसतं. प्रत्येकात उपजतच वेगवेगळ्या प्रमाणात सर्जनशीलता असते .कलावंतांमध्ये ,शास्त्रज्ञांमध्ये ही सर्जनशीलता इतर सामान्य माणसाच्या मानाने खूप जास्त असते आणि या जोडीलाच प्रतिभेचं पण एक वरदान त्यांना मिळालेलं असतं. ती प्रतिभा जपण्यासाठी ते स्वतः आतील सर्जनशीलता प्राणपणाने जपतात. एडिसन ची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे .विजेचा बल्ब प्रकाशित करण्यासाठी त्यांनी शेकडो प्रयोग केले .खूप खटाटोप केले. तेव्हा कुठे त्यांना विजेचा शोध लागला. अशी सर्जनशीलता सामान्य माणसांमध्ये पण असते पण तिला प्रतिभेची जोड मात्र नसते. म्हणून काय झालं ? आपल्या सर्जनशीलतेचा आविष्कार तर आपण करू शकतो.

अगदी कोंड्याचा मांडा करणारी गृहिणी, दररोज नवीन नवीन भरत काम करणारी स्त्री, एखाद्या अल्बमचं सुंदर डेकोरेशन करणारी व्यक्ती, बागेतला सौंदर्य फुलवणारी व्यक्ती, म्हणजेच काय जीवनातला कोणताही अनुभव घेताना जी व्यक्ती तो अनुभव प्रथम आनंद घेतो आहे अशा उत्साहाने आणि कुतूहलाने त्याला सामोरे जाते. रोज सकाळी उगवणारा सूर्य किंवा दारच्या वेलीवर फुलणारी पहिल्यावहिल्या फुल पाहण्यासाठी कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर पहाटेच उठून बाहेर येत हे त्यांनी लिहून ठेवलं. म्हणजेच अनुभव घेण्याची कला ही सर्जनाची पहिली पायरी आहे.

या पायरीवर प्रयत्न करण्याची संधी पालकांना आपल्या मुलांच्या संगोपनाच्या निमित्ताने सततच मिळत असते.”श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा . उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा !” या ओळी वाचताना धरणीला सुखावणाऱ्या त्या श्रावणाचं आगमन ,सुखाने तृप्त झालेली धरणीची सुखचित्र आपल्या डोळ्यासमोर येतात. खूप आनंद देऊन जातात. यात केवळ सुख देणाऱ्या आठवणीच असतात असं नाही तर,”जिंदगी के सफर मे गुजर जाती है वो.….. वो नही आते ..”राजेश खन्नाच हे गाणं, आगगाडीच्या आवाजाच्या बॅकग्राऊंड वरचे. त्याला कुठेतरी असा ही टच आहे की, गेले ते दिवस आता परत येणार नाही आहेत…,जसे मागे पडत असलेले अंतर. आयुष्याच्या प्रवासात मागे पडलेले दिवस.ती सुंदर कलाकृती म्हणूनच खूप आनंद देते.. कलावंत आपापल्या सर्जनशीलतेतून सुख आणि दुःख शब्दांच्या माध्यमातून असा व्यक्त करता येईल की कुणा एकाचं सुख किंवा दुःख हे अवघ्या मानवजातीचा सुखदुःख बनून जाते आणि त्यातून एक आनंद निर्मिती आणि सौंदर्य निर्मिती होत असते.

क्रिएटिविटी किंवा सृजनशीलता, विचार प्रक्रियेचा एक भाग आहे .क्रिएटिव्ह थिंकिंग ची काही वैशिष्ट्ये आहेत.

* सृजनात्मक विचारांमध्ये स्वमग्न विचार किंवा ऑटिस्टिक थिंकींग असते. स्वतः आतच मग्न राहून मनातल्या मनात विचार करून नवीन विचारांना जन्म देणे यांचा अंतर्भाव त्यात होतो. कधीकधी आपल्याही डोक्यात खुपच विचित्र व विलक्षण विचार येतात. पण अशा विचारांना सृजनशील कसं म्हणता येईल ? एखादा विचार सूजनशील तेव्हा ठरतो जेव्हा तो नवनिर्मिती करतो. योग्य वास्तव आणि परिस्थितीनुरूप असतो. अव्यवस्थिततेतून व्यवस्था लावणे, अवघड व गुंतागुंतीची काम करत राहणे यात त्यांच्या बुद्धी व क्षमतेचा कस लागतो आणि त्यांना आनंद मिळतो. निर्णय स्वातंत्र्य नेहमीच्या चाकोरीबाहेरचे विचार मुक्त आणि प्रामाणिक असतात.

* गिफ्टेड व्यक्तींचे, एक वैशिष्ट्य सुजनशीलता आहे. परंतु प्रत्येक सृजनशील व्यक्ती गिफ्टेड असेलच असे नाही. सृजनशील आणि गिफ्टेड अशी व्यक्ती self confidant आणि समाजप्रिय असते. सर्वसाधारण पण अधिक सृजनशील अशी व्यक्ती मात्र सुसमायोजन करणारी नसते.
सृजनशीलता यामध्ये वेगळे विचार, कल्पना यांचा समावेश फक्त होतो .तर बुद्धिमत्ता यापासून वेगळी, त्यात अनेक मानसिक क्षमतांचा समावेश होतो.

* Goal directed , म्हणजे ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी काहीएक पर्सनल किंवा पब्लिक लाभ होण्यासाठी उद्दिष्ट प्राप्तीसाठी ही निर्मिती होत असल्याने आनंद आणि मानसन्मान वाढतो.
नवीन गोष्ट नवीन वस्तू नवीन रचना निर्माण होते आणि तिचे स्वरूप हे भाषिक व अभाषिक , मूर्त-अमूर्त असून ते युनिक आणि असामान्य असते.
# क्रिएटिव्ह थिंकिंग याचे दोन भाग गिलफोर्ट याने सांगितलेले आहे. १) convergent यामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे लक्षापर्यंत पोहोचण्याचा पारंपरिक पद्धतीचा प्रयत्न होतो. तर २)
Divergent या प्रकारामध्ये प्रश्नांचा विविधांगांनी विचार करून मार्ग शोधणे किंवा अनेक पर्याय असताना त्यातून एखादे बरोबर उत्तर ,नवकल्पना म्हणून शोधून काढणे.

जी पूर्वानुभव असलेली माहिती आणि विचारांच्या आधारे, विचारांचा नवीन पॅटर्न किंवा कॉम्बिनेशन करणे ही उद्दिष्टपूर्ती असते, ते फक्त दिवास्वप्न नसते. फ्लेक्झिबिलिटी/ लवचिकता, कल्पकता उस्फूर्तता, अस्खलितपण ही वैशिट्य !
आपल्या दैनंदिन जीवनात दुःख आहे तसच सुखही आहे, भोग आहे, उपभोग आहे. या जीवनातले अमर्याद असे सौंदर्य, ईश्वरीय आणि त्याच्याच जोडीने वावरणारे मानवाच्या जीवनशैलीतून अटळपणे आपल्याला वाट्याला येणारे, दुःख दैन्य, दुर्दैवपण आहे, या सार्‍यातून आनंद निर्मिती करणं ही सर्जनशीलतेची किमया आहे आणि तेच तर आपल्या जीवनातील प्रयोजनही आहे. आपल्या स्वतःतील सर्जनशीलतेचा स्वतः जर सतत शोध घेत राहिलो तर एक गोष्ट आपोआप घडेल. ती सर्जनशीलता जपणं, त्याला खतपाणी घालवणे , जोपासणे,ही आपली खूप महत्त्वाची जबाबदारी आहे.

मग सध्या सुरू असलेल्या आयुष्यातल्या या लहान मोठ्या कसोटींच्या क्षणाला वाट्याला येणाऱ्या वेदना, दुःख ,पचवायला बळ आपोआपच मिळतं. उलट त्यातून आपलं संपूर्ण व्यक्तिमत्त्व उजळून निघतं. सध्या प्रत्यक्ष मित्रमैत्रिणींना भेटता येत नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून किती जण किती प्रकारची सर्जनशीलता जोपासत आहेत, हे खूप जाणवत . आणि त्यांच्याकडून स्फुर्ती ही मिळते.

सृजनाचा जतन करणारी शाळा म्हणजे, आनंद शिक्षणाचा स्वप्न पाहणाऱ्या रेणुताई दांडेकर यांची चिखलगाव येथील शाळा. एका कट्ट्यावर बसून मुलं कुणी लिहीतय,कुणी मस्ती करतंय, कुणी रे घोट्या मारताय, कुणी फिरताय ,दादागिरी ,दंगा ,मारामारी ,रडणं, एकटक कुठेतरी पाहणं ,गळ्यात गळे घालून चित्र काढणं, हातातील वस्तू घेऊन बडवणं ,टप्पल मारणं, प्रत्येकाच्या उस्फूर्तपणे काहीतरी चाललंय. शाळेत कुणीतरी विचारलं की मुलं काय करतायेत ? तर शिकताहेत असं उत्तर मिळालं, शिक्षक नाहीत आणि मग कसे शिकणार ? असा प्रश्न विचारल्यावर त्या व्यक्तींना उत्तर मिळालं,” हे अनुभव …ते त्यांना शिकवत आहेत.”

“अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी,”याला सृजन म्हणता येईल. आपल्यालाही आपल्या मुलांमधील या “सृजनाचा उत्सव” करता येईल का ?
# यासाठी उपक्रम घ्यावे लागतील. माणसांचे स्वभाव ,तऱ्हा ,विकृती ,संस्कारित मने, वागणं ,विलक्षण घटना ,सामान्य असामान्य माणसं ,आर्थिक स्थर ,जीवन प्रवास अशा असंख्य गोष्टी अवतीभवती दिसतील त्या जाणण्याच्या संवेदना मुलांमध्ये जागृत करता येतील.
# समाजातले प्रश्न ,चिंता, संघर्ष, चांगल्या घटना ,विचित्र घटना, त्यांच्यातला फरक, लढे हे सर्व पाहण्याची वृत्ती निर्माण करता येईल.
# माणसाला वाचून ,पाहून समजून घेणे यातून एक वेगळाच आकार निर्मितीला मिळत असतो.
# म्हणूनच त्यांनी दाखवायला आणलेल्या चित्रांकडे, दगड-माती कडे ,फुटक्या मण्यांकडे, चकचकीत कागदांकडे त्यांच्या कुतूहल भरलेल्या नजरेने आपण पहायला शिकू या.
# त्यांच्याशी वागताना रिंग मास्टर सारखे न वागता, क्षमाशील नजरेने पहात राहूया. अधून मधून त्यांच्याबरोबर काही कलेच्या वस्तू बनवून ,काही फराळाचे पदार्थ बनवून किंवा दिवसाकाठी पाच दहा मिनिटं स्वत: साठी स्वस्थ मनानं काहीही न करता एका जागी बसून राहू. इतरांचा मनोमन स्वीकार करू .दुःखाच्या काळात सुंदर आठवणींमध्ये रमून जाण्याचा प्रयत्न करू.

फ्रेंड्स ! मुख्य म्हणजे सर्वात महत्त्वाचे प्रत्येक परिस्थिती, संकटात, एक विधायक पर्याय हमखास उपलब्ध असतो हे कधीही विसरायला नको. मग अशा प्रयत्नांमधून सर्जनशीलता उत्तरोत्तर आपल्या वाट्याला येणाऱ्या सुखामधून आनंद मिळवायला आपल्याला प्रवृत्त करेल. हळूहळू आपण आपोआपच आनंदात जगायला शिकलो तर तीच आपल्याला आयुष्यातल्या लहान मोठ्या कसोटीच्या क्षणी सहीसलामत बाहेर पडायला मार्ग दाखवेल, वाट्याला येणारी वेदना आणि दुःख पचवायचा बळही पुरवेल. व्यक्तिमत्व प्रगल्भ होवून उजळून निघेल आणि मग कवी बोरकर म्हणतात, तशी “सोसल्याचा सूर होतो ” हा अनुभव त्या सोसण्यातून सुद्धा तुम्हाला येत जाईल.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशन व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button