‘कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या!’ शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

मुंबई : ‘साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या…’ असं आपुलकीचं आमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरुड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती.

अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर काही तासांत शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती या जिल्ह्यांतील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी परभणीतील शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले. विठ्ठलराव गरुड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. आता लेकीच्या लग्नाला या, असे आपुलकीचे निमंत्रण विठ्ठलराव यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

तर अहमदनगरमधील पोपट मुकटे यांनी पूर्वीसारखे कर्जमाफीसाठी हेलपाटे मारावे लागले नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या वेळी पाच ते सहा वेळा फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. मात्र, यावेळी एका थम्बवरच (अंगठ्यावर) काम झाले, असे मुकटे यांनी सांगितले. कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची दुसरी यादी आता २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. दरम्यान कर्जमाफीसाठी राज्यातील ३४ लाख ८३ हजार ९०८ खातेदारांची माहिती एकत्र करण्यात आली होती. पहिल्या यादीत १५ हजार ३५८ लाभार्थी शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

‘ठाकरे’ सरकारकडून आनंदाची बातमी; शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर