ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी – अनिल देशमुख

कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा

Anil Deshmukh Meeting

अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी यंत्रणांना आवश्यक सामग्री वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पोलीस यंत्रणेलाही होमगार्ड आदी आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यात येईल. कोरोनाचे ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून विशेष दक्षता घेऊन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले.

गृह मंत्री श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार बळवंतराव वानखडे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक हरी बालाजी आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात 39 कंटेन्मेंट झोन, अद्यापपर्यंत आढळलेले 190 रूग्ण आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होत आहेत. पीपीई किट, मास्क, ऑक्सिजन सिलेंडर आदी सामग्री यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. ग्रामीण भागात संक्रमण होता कामा नये. पोलीस दलाला लागतील तेवढे होमगार्ड उपलब्ध करून दिले जातील. पोलीसांवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पोलीस दलाच्या कंपन्या मागविण्यात आल्या आहेत. एक कंपनी अमरावतीत आली आहे. पण अकोल्यात गंभीर स्थिती लक्षात घेता तिथे प्राधान्य द्यावे लागणार आहे. मात्र, अजून मनुष्यबळ मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

अकोला व अमरावती येथे अधिक गंभीर रूग्ण असल्यास त्यांना नागपूर येथे हलविण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करता येते किंवा कसे, हे तपासण्यासाठी एक पथक नेमण्यात येत आहे. त्यांच्याकडून अहवाल मागवून त्यादृष्टीने निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्य हवे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, कोरोना संकटकाळात अनेक नवे प्रश्न उभे राहत आहेत. प्रशासन अहोरात्र काम करत आहे. कामात अनेकदा त्रुटी राहू शकतात. त्या वेळोवेळी दुरुस्त करण्यात याव्यात. मात्र, प्रशासनाचे मनोबल टिकून राहिले पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून व प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे. सर्वांच्या सहकार्यानेच आपल्याला या साथीवर मात करता येईल, असे आवाहन गृह मंत्र्यांनी केले.

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांत पोलीस आघाडीवर काम करत आहेत. हे लक्षात घेऊन सेवेतील वयाने 55 वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याची सूचना देण्यात आली आहे. वयाने 50 पुढे असलेल्यांना जनतेशी थेट संपर्क येईल, अशी कामे दिली जात नाहीत. पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. दक्षता साधने व प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप होत आहे. दुर्दैवाने कुणी मृत्युमुखी पडल्यास 10 लाख रूपये सानुग्रह अनुदानाचाही निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याबाबत जिल्ह्यातील कार्यवाहीचा आढावाही त्यांनी घेतला. कोविड हेल्थ सेंटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्य विषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारांना तत्काळ आळा घालावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. परप्रांतीय कामगार बांधवांना रेल्वे, बसने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प. बंगालमधील चक्रीवादळाने तेथील कामगार बांधवांसाठी रेल्वे सोडता आली नाही. मात्र, लवकरच त्यांना स्वगृही पोहोचविण्याचा निर्णय होईल. त्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात तीन टप्प्यांत सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातून लक्षणे आढळणा-या नागरिकांची तत्काळ तपासणी करण्यात आली. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांचे पथक गावोगाव नियुक्त करण्यात आले आहे. सर्व यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. येणा-या अडचणींचे तत्काळ निराकरण होत आहे. या काळात प्रशासनाचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले. जिल्ह्यातील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगले काम होत आहे. त्यांना विविध आवश्यक साधने मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.

Source:- Mahasamvad News


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER