अजित पवार म्हणाले, म्हणून मी सांभाळून बोलतो !

नाशिक :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  आपल्या कामाचा झपाटा असूनही तसाच ठेवला असून नाशिक जिल्ह्यात त्यांनी आज सकाळी ७ पासूनच हजेरी लावली. नंतर त्यांनी दुपारी नाशिकमध्ये विभागीय आढावा बैठक घेतली तसेच अधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी सगळ्यांनाच सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, आम्ही जबाबदार पदावर काम करत असल्याने बोलताना तारतम्य बाळगणे महत्त्वाचे  आहे. त्यामुळे वाद होणार नाही.

अजित पवार म्हणाले, मागील काळात चुकीच्या बोलण्याने मला आत्मक्लेश करावा लागला होता. अद्याप कोणत्याही जिल्हानिर्मितीचा निर्णय झाला नाही. याबाबत मागण्या अनेक असल्या तरी विचार नाही. गेल्या वर्षी नऊ हजार कोटी रुपयांचा निधी वाटप झाल्याचे सांगत ते म्हणाले, मागील वर्षी नागपूरला २३७ कोटी तर चंद्रपूरला १०७ कोटी रुपये जास्त देण्यात आले.

ही बातमी पण वाचा : वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत गावाच्या वैभवात भर घालणारी – अजित पवार

जिल्हा नियोजन बैठकीत मंजूर करणे शक्य नसलेला निधी राज्य अर्थसंकल्पात तरतूद करणार. पोलीस, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, नर्स, महसूल विभागात कर्मचारी कमतरता असल्याचे ते म्हणाले.

राज्यात आठ  हजार नवीन पोलीस तसेच इतर विभागात नवीन कर्मचारी भरती करणार असल्याचे ते म्हणाले. अनुसूचित जाती उपायोजनेकरिता प्रत्येक जिल्ह्याला अतिरिक्त निधी मंजूर आहे. मागच्या सरकारच्या काळात आदिवासी विकासाकरिता काहीच प्रयत्न झाला नाही.

लोकसंख्या, क्षेत्रफळ या आधारावर राज्यातील ३६ जिल्ह्यांत निधी देण्यासाठी सूत्र ठरवले आहे. उत्तर महाराष्ट्रात शाळा, आरोग्य, ग्रामीण रस्ते याकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रत्येक विभागात सर्व कामांचा आढावा घेत असल्याचे ते म्हणाले.