कोरोना योद्ध्यांच्या मुलांसाठी मेडिकल प्रवेशात राखीव जागा

Corona Warriors - Dr. Harsh Vardhan

नवी दिल्ली : कोरोना (Corona) महामारीचा प्रसार रोखणे आणि या आजाराच्या रुग्णांवर उपचार करणे यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ या वैद्यकीय तसेच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये राखीव जागा ठेवल्या जाणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या नव्या आरक्षणाला संमती दिली आहे. हे आरक्षण केंद्र सरकारच्या कोट्यातील जागांमध्ये ठेवले जाईल.

या आरक्षणामुळे नि:स्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या ‘कोरोना योद्ध्यांच्या (Corona Warriors) त्यागाचा गौरव होईल, असे डॉ. हर्षवर्धन ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. मात्र या आरक्षणाचे प्रमाण किती असेल, हे त्यांनी सांगितले नाही.

‘कोरोना योद्धे’ म्हणजे नेमके कोण, याची नेमकी व्याख्याही सरकारने अद्याप केलेली नाही. परंतु सर्वसाधारणपणे डॉक्टर, परिचर्या कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस इत्यादींचा उल्लेख ‘कोरोना योद्धे’ असा करण्याची प्रथा ही महामारी सुरू झाल्यापासून पडली आहे.

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यांची झळ पोहचलेल्या लोकांच्या मुलांनाही ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’ प्रवेशात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने याआधीच घेतला आहे. यात दहशतवाद रोखण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा दलांतील कर्मचारी, दहशतवाद्यांच्या ‘हिट लिस्ट’वर असलेल्यांची मुले आणि सध्याच्या परिस्थितीमुळे काश्मीर सोडून अन्यत्र स्थलांतर करावे लागल्याने उपजीविकेचे साधन नसलेले लोक यांचा समावेश असेल.

पंजाबमधील चंदीगड आणि फगवाडा या दोन विद्यापीठांनीही कोरोना योद्ध्यांच्या मुलांना सवलती देण्याचे जाहीर केले आहे. चंदीगड विद्यापीठ त्यांच्यासाठी प्रवेशांमध्ये १० टक्के राखीव जागा ठेवणार आहे आणि फीमध्ये १० टक्के सवलत देणार आहे तर फगवाडा विद्यापीठ कोरोनाबाधितांच्या व कोरोना योद्ध्यांच्या मुलांना विनामूल्य शिक्षण देणार आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER