एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी संगीत भाषा- प्रांतापलीकडे पोहोचविले – मुख्यमंत्री ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई: आपल्या नाद-मधुर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलीकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम (SP Balasubramaniam) यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेले संगीताचे वरदान ‘एसपीं’नी आपल्या सुरांनी आणखी झळाळून टाकले. त्यांनी सोळा भाषांतून हजारो गाणी गायली, तीही विविध प्रकारची. यातून सुरांवर हुकुमत गाजविणाऱ्या ‘एसपीं’नी आपला एक रसिक वर्ग निर्माण केला. संगीत हे भाषा आणि प्रांत या पलीकडे असते हे सिद्ध करत ‘एसपीं’नी आपल्या नाद-मधुर सुरांनी भारतासह जगातील रसिकांना मोहवून टाकले. त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती. अगदी अलीकडे त्यांनी मराठीतही एक गाणे आपल्या मनस्वी शैलीत गायले होते. कोरोनाशी झुंज देत असणाऱ्या या सुरांच्या दुनियेतील अवलियाला काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त्यांच्या आवाजाची जादू मागे राहील, ते त्या अर्थाने अजरामर आहेत. पण एक मनस्वी कलाकार आपल्यातून निघून जाणे दुःखद आहे. ज्येष्ठ गायक एस.पी.सुब्रमण्यम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER