ममता बॅनर्जींविरोधात मुख्यमंत्रिपदासाठी दिग्गज क्रिकेटपटूच्या नावाची चर्चा!

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा (West Bengal Assembly Elections) कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर आता भाजपाच्या गोटात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? याची चर्चा सुरू आहे. या चर्चेत अनपेक्षितपणे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचे नाव पुढे आले आहे. सध्या भाजपाच्या वर्तुळात सौरव गांगुलीच्या नावाची चर्चा आहे. सौरव गांगुलीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याविरोधात रिंगणात उतरावे, अशी भाजपाची इच्छा आहे. काही दिवसांमध्ये सौरव गांगुलीच्या प्रकृतीमध्ये आलेले चढउतार पाहता, हे कितपत शक्य आहे, याविषयी शंका आहे.

भाजपा गांगुलीच्या नावासाठी आग्रही का?

पश्चिम बंगालमध्ये भाजपाकडे मुख्यमंत्रीपदासाठी नेत्यांची कमतरता नाही. मात्र, हा चेहरा बंगाली अस्मितेला साद घालणारा आणि जनतेला आपलासा वाटणारा हवा, असा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासंदर्भात भाजपाच्या गटात बरेच वादंग आहेत. सौरव गांगुली यांनी ही ऑफर फेटाळल्यास तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या बड्या नेत्यांपैकी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून उभे केले जाऊ शकते.

ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाचे आव्हान

ममता बॅनर्जी या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. नरेंद्र मोदी किंवा अमित शाह सोडले तर ममता बॅनर्जी यांच्या ताकदीचा नेता बंगाल भाजपामध्ये नाही. अशावेळी सौरव गांगुलीसारखा बंगाली अस्मितेला साद घालणारा नेता रिंगणात आल्यास भाजपाला फायदा होऊ शकतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला. मात्र, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने १८ मतदारसंघ जिंकून ताकद दाखवली. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये टक्कर पाहायला मिळणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER