शिवसेनेची लाचारी पाहून ….प्राण तळमळला

Shivsena

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या गौरवाचा ठराव विधानसभेत आणण्याचा प्रयत्न करून भाजपने शिवसेनेची कोंडीकरण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आधी सावरकर यांना मोदी सरकारने भारतरत्न द्यावे मग आम्ही सावरकरांच्याअभिनंदनाचा ठराव आणू अशी अतार्किक आणि शिवसेनेला सोडून कोणालाही पटू शकणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी यावेळी विधानसभेत घेतली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे ज्येष्ठ मंत्रीयावेळी सभागृहात होते पण ते एक शब्दही बोलले नाहीत. अजित पवार यांनी सावरकर यांच्याविषयी आदर तर व्यक्तकेला पण गौरवाचा ठराव आणलाच पाहिजे अशी भूमिका मात्र घेतली नाही. सावरकरप्रेमींना एकीकडे गोंजारायचे पणदुसरीकडे ठराव येऊ द्यायचा नाही अशी काळजी त्यांनी घेतली. शिवसेनेची लाचारी,काँग्रेसची गुपचिळी, राष्ट्रवादीचीसावध खेळी असे बुधवारच्या सभागृहातील घटनाक्रमाचे वर्णन करावे लागेल.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेला आता केवळ पवारांची भाषा कळते – चंद्रकांत पाटील

सावरकरांची विज्ञानवादी भूमिका सगळ्यांना मान्य आहे का असा सवाल अजित पवार, अध्यक्ष नाना पटोले यांनीकेला. पटोले आणि पवार यांनी सावरकरांचा विज्ञानवाद किती वाचला आहे माहिती नाही पण ज्यांनी त्या विषयी वाचलेलेनाही त्यांच्यासाठी एवढेच सांगावेसे वाटते की, हिंदू धर्मातील वाईट चालीरितींवर त्यांनी या धर्मातच राहून प्रहार केले. तथाकथित धर्मपंडितांची सावरकरांच्या विज्ञानवादी भूमिकेमुळे अनेकदा पंचाईत झाली आणि ते उघडेदेखील पडले. त्यामुळे टोकाची आणि पूर्वग्रहदूषित पांडित्य बाळगणाऱ्यांनी सावरकरांचे विचार कधी पचनी पडले नाहीत.कितीकाँग्रेसवाल्यांनी सावरकरांचे विचार आणि लिखाण वाचले आहे? प्रयोगसिद्ध विज्ञान हाच आधुनिक भारताचा वेद झालापाहिजे,असे ठाम प्रतिपादन सावरकर करत. धार्मिक रूढी विरुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन यापैकी वैज्ञानिक दृष्टिकोननिवडण्यास त्यांनी समाजाला प्रेरित केले. बुद्धिप्रामाण्यवादातून त्याकाळी जन्मलेले विचार आजही कुणी इतक्या धाडसीपद्धतीने मांडू शकेल, याबद्दल शाश्वती देता येत नाही.

सनातनी विचारांचा प्रभाव प्रचंड असलेल्या त्याकाळी किती चुकीच्या कल्पना होत्या? चातुर्वर्ण्य संस्थेवर गाढा विश्वास, पोथीजात जातीभेद, त्यातून जन्माला आलेल्या विविध प्रकारच्या बंदी उदा. स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, इ. एक ना दोनकिती किती अंधश्रद्धा! हे पोथीनिष्ठ जुनाट आचार पाहून सावरकरांची लेखणी परजली. त्यांनी या अपप्रवृत्तींवर प्रहारकेले. ज्या माणसाने कट्टर हिंदुत्ववादी असतानाही पोथीपुराणाच्या भ्रामक कल्पना टराटरा फाडल्या, ब्रिटिशराज्यसत्तेविरुद्ध एल्गार केला तो बलात्कारी होता हे काँग्रेसच्या मुखपत्रात म्हटले जावे याच्याइतके दुर्देव ते नाही. देशासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये अनन्वित छळ सोसणाऱ्या सावरकर यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वाधिककाळ तुरुंगवास भोगला पण आज त्यांच्याच जन्मभूमीत म्हणजे महाराष्ट्रात त्यांच्या गौरवाचा ठराव विधानसभेत मंजूर होणेतर सोडाच पण मांडलादेखील जाऊ नये यापेक्षा दुर्देव ते काय असावे? ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राणतळमळला असे सावरकरांनी सेल्युलर जेलमध्ये लिहिले. मातृभूमीच्या ओढीने व्याकूळ झालेल्या सावरकरांचे ते बोल होते. सावरकर! आम्हाला माफ करा. ज्या मातृभूमीच्या आठवणीने आपला प्राण तळमळला होता त्याच मातृभूमीने तुमच्यागौरवाचा ठराव बुधवारी विधानसभेत मांडला नाही. ज्या महाराष्ट्राचा आपल्याला जाज्वल्य अभिमान होता त्या महाराष्ट्राचाआत्मा आज नक्कीच हळहळला असेल.