कोर्टात येताना सोनू सूदचा ‘हेतू’ व ‘हात’ही स्वच्छ नव्हते

Mumbia HC & Sonu Sood
  • बेकायदा बांधकाम प्रकरणी हायकोर्टाचा अभिप्राय

मुंबई : जुहू येथील ‘शक्तिसागर’ या निवासी इमारतीत केलेले बेकायदा बांधकाम व फेरबदल पाडून टाकण्यासाठी महापालिकेच्या प्रस्तावित कारवाईविरुद्ध अंतरिम मनाई हुकूम मिळविण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद व त्याची पत्नी सोनाली हे ‘स्वच्छ हेतूने’ व ‘स्वच्छ हाता’ने कोर्टात आले नव्हते, असा प्रतिकूल अभिप्राय मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविला आहे.

अंतरिम मनाई नाकारण्याच्या नगर दिवाणी न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सोनू सूद व सोनाली यांनी केलेले अपील न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी फेटाळले होते. त्याचे ३४ पानांचे सविस्तर निकालपत्र आता उपलब्ध झाले आहे. या निकालाविरुद्ध सोनू सूद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.

न्यायालयात केलेल्या याचिकेत प्रकरणाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती न देणे किंवा त्यातील काही माहिती दडविणे याला न्यायालतीन भाषेत ‘स्वच्छ हातांनी कोर्टात न येणे’ असे म्हटले जाते. सोनू व सोनाली यांच्यावर हा ठपका ठेवताना न्या. चव्हाण यांनी म्हटले की, महापालिकेनेअशाची प्रकारची कारवार्ई सन २०१८ मध्ये केली होती व इमारतीत केलेले बेकायदा बांधकाम व फेरबदल पाडून टाकले होते. तरी पुन्हा तसेच बांधकाम व फेरबदल करणे सुरु केले गेले म्हणून महापालिकेने आताची ही कारवाई सुरु केली ही माहिती सोनू न सोनालीने त्यांच्या अपिलाच्या याचिकेत प्रामाणिकपणे दिली नाही.

सोनू न सोनालीचा कोर्टात येण्याचा हेतू स्वच्छ नाही, असे आपण का म्हणतो हे स्पष्ट करताना निकालपत्र म्हणते की, ‘शक्तिसागर ही तळमजला व वर सहा मजले असलेली निवासी इमारत आहे. या इमारतीचे आपल्याला निवासी हॉटेल बनवायचे आहे, असे सोनू न सोनाली यांनी स्वत:च त्यांच्या अपिलात म्हटले आहे. पण त्यांचा राहता प्लॅट सोडून इमारतीच्या अन्य भागाची मालकी अद्याप त्यांच्याकडे नाही. आपल्याला निवासी इमारतीचे हॉटेल करायचे असेल तर त्यासाठी ‘वापरात बदला’ची परवानगी घ्यावी लागेल याची सोनू व सोनाली यांनी पूर्णपणे कल्पना होती. म्हणूनच त्यांनी तसा अर्जही महापालिकेकडे केला होता. परंतु त्या अर्जावर निर्णय होण्याआधीच त्यांनी इमारतीत वाढीव बांधकाम व फेरबदल करणे सुरु केले. महापालिकेची आताची कारवाई त्याच संदर्भात आहे. म्हणजे सोनू व सोनाली आपल्या अप्रामाणिकपणावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी कोर्टात आले आहेत.(न्यायालयीन भाषेत पक्षकाराच्या अशा वर्तनाला ‘स्वच्छ हेतूने कोर्टात न येणे’ असे म्हटले जाते.)

आपण फक्त देखभाल व डागडुजीचे काम करत आहोत व ते करण्यासाठी महापालिकेच्या परवानगीची मुळीत गरजच नाही, असा सोनूचा आणखी एक मुद्दा होता. तो साफ फेटाळताना न्या. चव्हाण म्हणतात, आम्हाला त्या इमारतीत हॉटेल सुरु करायचे आहे, हे सोनू व सोनाली यांचे अपिलातील स्वत:च केलेले प्रतिपादन त्यांचा हा मुद्दा खोड़ून काढणारे आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER