सोनू सूदचा फोर्ब्सनेही गौरव केला

Maharashtra Today

सिनेमात व्हिलनची भूमिका करणाऱ्या अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) वास्तव जीवनात सिनेमातील हीरोही करणार नाही अशी कामे कोरोनाकाळात केली. यासाठी त्याने स्वतःच्या खिशातून कोट्यवधी रुपये खर्च केले. सर्वप्रथम त्याने कोरोनाकाळात स्वतःच्या गावी जाणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी बस, ट्रेन, विमानाची सोय करून दिली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मदतीची हाक देणाऱ्या सगळ्यांना मदत करण्यासही सुरुवात केली. आताही तो गरजूंना मदत करीत आहे. त्याच्या या कामाची भारतात दखल घेऊन त्याला अनेक पुरस्कार देण्यात आला आता तर फोर्ब्सनेही त्याच्या या अनोख्या कामाची दखल घेऊन त्याला लीडरशिप अॅवॉर्ड २०२१ (Leadership Award 2021) ने गौरवले आहे.

स्वतः सोनू सूदनेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर याची माहिती दिली आहे. सोनू सूदने फोर्ब्सने त्याला दिलेल्या ट्रॉफीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फोर्ब्सने त्याला कोविड-१९ चा हीरो म्हटले आहे. या फोटोसोबत सोनू सूदने हात जोडत पुरस्कार दिल्याबद्दल फोर्ब्सचे आभार मानले आहेत. कोरोना असल्याने सोनूला हा पुरस्कार व्हर्च्युअल पद्धतीने देण्यात आला. फोर्ब्स इंडियाच्या फेसबुक पेजवर दिलेल्या माहितीनुसार, सोनू सूदने त्याच्या भाषणात श्रमिकांच्या रोजगाराबाबत बोलत आगामी ५ वर्षात जवळ जवळ १० कोटी लोकांना रोजगार देणार असल्याचे म्हटले. प्रत्येक प्रवासी श्रमिकाला एक डिजिटल ओळख दिली जाणार असून त्यात त्याच्या कामाचे तास, आरोग्य सुविधा आणि त्याच्या राहणीमानाला ट्रॅक केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्पाईसजेटनेही सोनूच्या कामाची प्रशंसा करीत त्याला अनोख्या पद्धतीने अभिवादन केले होते. याची माहिती आम्ही तुम्हाला दिलीच होती.

सोनूने केलेल्या या अनोख्या कामामुळे निर्माते आता त्याच्याकडे खलनायकाच्या नव्हे तर नायकाच्या भूमिका घेऊन जाऊ लागले आहेत. सोनू सध्या तेलुगू सिनेमा ‘आचार्य’मध्ये साऊथचा मेगास्टर चिरंजीवीसोबत दिसणार आहे. याशिवाय त्याने आणखी दोन सिनेमे साईन केले असून त्याचे शूटिंग तो लवकरच सुरु करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER