अविरत मदतीसाठी मालमत्ता गहाण ठेवून सोनू सूदने घेतले १० कोटीचे कर्ज

Sonu Sood

मुंबई :- लॉकडाऊन काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने परप्रांतीयांना त्यांच्या गावाला सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली होती. त्यासाठी त्याने शेकडो बसेसचा खर्च वहन केला होता. मात्र या कार्यासाठी त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला होता.

मात्र त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं  असून, तो आजही मदत करत असल्याचे उघड झाले आहे. अविरत मदत करण्यासाठी त्याने आपली मालमत्ता गहाण ठेवल्याचेही समोर आले आहे. त्याने अलीकडेच १० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. जेणेकरून तो गरजूंना मदत करणे चालू ठेवू शकेल.

महामारीच्या वेळी लाखो प्रवाशांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचण्यास त्याने मदत केली होती. साथीच्या आजाराच्या वेळी तो अनेकांना तारणारा आणि खरा नायक म्हणून पुढे आला. सोनू सूदच्या ट्विटर पेजला दिलेल्या भेटीतून असे दिसून आले आहे की, तो आता दररोज देशभरातील गरजू लोकांना वैद्यकीय मदत पुरवत आहे. हे सर्व खर्चिक असले तरी तो हसतमुखाने मदत करत आहे. सोनू सूदने १० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यासाठी त्याच्या जुहूमधील मालमत्ता तारण ठेवल्या आहेत आणि गरजूंना मदत करण्याचे काम सुरू ठेवले आहे.

मिळालेल्या कागदपत्रांवरून असे दिसून येते की, सोनू सूदने जुहू येथील शिव सागर सीएचएस नावाच्या इमारतीतील  दोन दुकाने आणि सहा फ्लॅट गहाण ठेवले आहेत. तारण ठेवलेल्या मालमत्तांमध्ये तळ मजल्यावरील दोन दुकाने आणि इमारतीच्या पहिल्या ते सहाव्या मजल्यावरील प्रत्येक फ्लॅटचा समावेश आहे.

गहाण ठेवलेल्या मालमत्ता सोनू सूद आणि त्यांची पत्नी सोनाली यांच्या नावावर आहेत. कागदपत्रांमधून असे दिसून आले आहे की, पेपरचे काम सप्टेंबरमध्ये केले गेले होते आणि २४ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांची नोंद झाली. ही संपत्ती मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या खासगी बँकेकडे गहाण ठेवण्यात आली आहे. सूदच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये “आमची सेवा विनामूल्य आहे.” असे नमूद आहे. गरजूंसाठी एक मोबाईल नंबरदेखील पोस्ट केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER