सोनिया, राहुल, प्रियंका गांधी यांनी घेतली हायकोर्टात धाव

rahul gandhi - priyanka gandhi - sonia gandhi - Maharastra Today
  • प्राप्तिकर प्रकरणे अन्यत्र वर्ग करण्यास आक्षेप

नवी दिल्ली : आपली वर्ष २०१८-१९ च्या प्राप्तिकर निर्धारणाची प्रकरणे नियमित प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून ‘सेंट्रल सर्कल’कडे वर्ग करण्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल आणि प्रियंका या त्यांच्या दोन मुलांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत. न्या. राजीव शकधर व न्या. तलवंत सिंग यांच्या खंडपीठाने या याचिकांवर नोटिसा जारी करून प्राप्तिकर विभागास उत्तराची प्रतिज्ञापत्रे सादर करण्याचे निर्देश दिले.

पुढील सुनावणी  ६ एप्रिल रोजी ठेवली गेली. शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारी याच्या कंपन्यांच्या प्राप्तिकर निर्धारणासोबतच समन्वयाने हाताळता यावीत यासाठी गांधी यांच्या करनिर्धारणाची प्रकरणेही ‘सेंट्रल सर्कल’कडे वर्ग करण्यात येत असल्याचे कारण प्राप्तिकर विभागाने दिले होते. तिन्ही गांधींच्यावतीने ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी असा युक्तिवाद केला की, गांधींची प्रकरणे तपासाची (Search Cases) नाहीत. एखाद्या मुख्य प्रकरणात तपास केला जात असेल तर तो समन्वयाने करता यावा यासाठी त्याच्याशी संबंधित आनुषंगिक प्रकरणेही ‘सेंट्रल सर्कल’कडे पाठविली जाऊ शकतात. गांधींच्या प्रकरणात तशी स्थिती नाही. अ‍ॅड. दातार पुढे असेही म्हणाले की, संजय भंडारी समूहातील कंपन्यांच्या प्रकरणांसोबत तपास करण्यासाठी असे करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

पण भंडारींच्या प्रकरणांशी गांधींच्या करनिर्धारणाचा अन्योन्य संबंध काय याचा काहीच खुलासा करण्यात आलेला नाही. प्राप्तिकर विभागाच्यावतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी प्राप्तिकर कायद्याच्या कलम १२७(२) व १२७(३) या हवाला देत विभागाच्या कृतीचे समर्थन केले. प्रकरणे अशा प्रकारे वर्ग करताना करदात्याला पूर्वसूचना देण्याचे  कोणतेही बंधन नाही, असे त्यांचे म्हणणे होते. सॉलिसिटर  जनरल असेही म्हणाले की, आपले करनिर्धारण प्रकरण अमुक  एकाच कार्यालयात केले जावे, असे सांगण्याचा करदात्याला कोणताही मूलभूत अधिकार नाही. रास्त पद्धतीने करनिर्धारण केले जावे, एवढाच त्याला वैधानिक हक्क आहे. तपासाची नसलेली प्रकरणे ‘सेंट्रल सर्कल’कडे पाठविली जाऊ शकत नाहीत, असा कोणताही नियम नाही; शिवाय ‘सेंट्रल सर्कल’ हेही दिल्लीतच असल्याने प्रकरणे तेथे वर्ग केल्याने गांधी यांना कोणतीही प्रतिकूलता येणार नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button