सोनिया, प्रियांका का फिरल्या नाहीत?

badgeदोन्ही काँग्रेसचे भवितव्य ठरवणारी निवडणूक महाराष्ट्रात २१ तारखेला आहे. उद्या सायंकाळी प्रचार थांबेल. काँग्रेसने ह्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले का? याची चर्चा सध्या रंगली आहे. राष्ट्रवादीतल्या दिग्गज नेत्यांनी युतीचा आश्रय घेतला तेव्हा शरद पवारांनी वय विसरून आखाड्यात उडी घेतली. एका राज्याची निवडणूक असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सभा गाजवल्या. पण काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी फिरकल्याही नाहीत. बँकॉकहुन परतलेल्या राहुल गांधींनी शेवटच्या टप्प्यात काही सभा केल्या. सोनिया असे का वागल्या असाव्या? निवडणुकीचा निकाल त्यांना कळला असावा का? काँग्रेस हरणारच आहे तर जायचे कशाला? असाही विचार त्यांनी केला असू शकतो.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस पक्ष अजूनही स्वतःला सावरू शकलेला नाही असेच दिसते. राहुलबाबा अध्यक्षपद सोडून पळाले. तात्पुरता म्हणून त्यांच्या आईने भार उचलला. पण त्या असून नसल्यासारख्या आहेत. तब्येतीमुळे त्यांच्यावर मर्यादा आल्या आहेत. प्रियांका माहोल बनवू शकल्या असत्या. त्यांना का कोंडून ठेवले, हे कोडे आहे. प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात थोडेफार फिरले. पण त्याचा फायदा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आपापल्या मतदारसंघात अडकून पडले होते. काँग्रेसकडे नेते उरले नाहीत, कार्यकर्ते केव्हाच सोडून गेले आहेत. काँग्रेस नावाचा कुणी पक्ष अस्तित्वात होता असे पुढच्या निवडणुकीत म्हणावे लागेल अशी पाळी येऊ शकते.

राष्ट्रवादीची परिस्थिती वेगळी नाही. शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याचा फाजील उत्साह दाखवला नसता तर राष्ट्रवादीची परिस्थिती काँग्रेसपेक्षा वाईट असती. ईडीच्या उडीमुळे राष्ट्रवादीला टॉनिक मिळाले. घरात बसलेले कार्यकर्ते बाहेर निघाले. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या होत्या. अखेरच्या टप्प्यात मोदी-शहा जोडीने केलेल्या झंझावाती सभांमुळे युतीला पुन्हा सत्ता मिळणार आहे. ह्या निवडणुकीत पहिलवान कोण? हा मुद्दा पुढे आला. ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याची पवारांची संधी हुकणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार आहेत आणि विदर्भात भाजपच्या जागा वाढणार आहेत. देवेंद्र फडणवीस हेच ‘तेल लावलेले पहिलवान म्हणून सिद्ध होतील.