भाजपाचे सोनियांना प्रत्युत्तर; हिंसाचारामागील चेहरे दोन महिन्यांत पुढे येणार

Prakash Javadekar-sonia gandhi

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारावरून काँग्रेस आणि भाजपा यांनी आज बुधवारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत. काँग्रेसने पत्रपरिषद घेऊन केलेल्या आरोपांना भाजपानेही आज प्रत्युत्तर दिले.

हिंसाचारावरून राजकारण करणे चुकीचे असून, असे राजकारण करू नका, असे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना उद्देशून त्यांनी हा निशाणा साधला. भाजपाच्यावतीने जावडेकर यांनी दिल्लीत आज पत्रपरिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी हा निशाणा साधला.

दिल्ली हिंसाचार : सोनिया गांधींनी मागितला अमित शहा यांचा राजीनामा

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. हिंसाचार होत असताना अमित शहा कुठे होते, असा सवालही त्यांनी केला.

या आरोपाला उत्तर देताना जावडेकर म्हणाले, दिल्लीतील हिंसाचारामागील चेहरे दोन महिन्यांत पुढे येतील. हिंसेचे समर्थन करणारे लोकच आता विरोध करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे होते ते विचारता, मात्र, राहुल गांधी कुठे आहेत, ते सांगा, असा प्रतिप्रश्न यावेळी जावडेकर यांनी सोनिया गांधींना उद्देशून केला.