सोनिया गांधी सक्रिय नाहीत; आता शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करावे- संजय राऊत

Sonia Gandhi - Sharad Pawar - Sanjay Raut - Maharashtra Today

नाशिक : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यूपीएच्या (UPA) नेतृत्वाबाबत मोठं विधान करून काँग्रेसला (Congress) मोठा धक्का दिला आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) सध्या सक्रिय राजकारणात नाहीत. देशात भाजपाप्रणीत (BJP) एनडीएसमोर काँग्रेसप्रणीत यूपीए प्रमुख विरोधकाची भूमिका निभावत आहेत. मात्र, आता यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी सक्रिय नाहीत. त्यामुळे यूपीएची ताकद कमी झाली असून यूपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी करावं, असं मोठं विधान राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. राऊत हे आज नाशिकमध्ये (Nashik) होते. राऊत यांनी आज नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसनं नेतृत्व केलं. मात्र आता यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी पूर्वीसारख्या सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षांची आघाडी कमजोर झाली आहे. आता देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत करायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांना घ्यायचे असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं. आज अनेक प्रादेशिक पक्ष हे यूपीएमध्ये सहभागी नाहीत. मात्र त्यांना यूपीएमध्ये येण्याची इच्छा आहे. यासाठी शरद पवार हे सक्षम नेतृत्व आहे, असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरही (West Bengal Elections) भाष्य केले. देशाचं महाभारत हे पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. मात्र, आम्ही सगळे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या बाजूने आहोत. भाजपच्या जागा वाढतील. मात्र, बहुमत हे फक्त ममता यांनाच मिळेल. शिवसेनेचा पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढण्याचा विचार सुरू होता. मात्र, यावेळी ममता यांना पाठिंबा देणे योग्य असल्याचे शिवसेनेचे मत झाले. त्यामुळे शिवसेनेने बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER