पवार-सोनिया भेटीत फार्मुला ठरला, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्यावर एकमत?

Sharad pawar-Sonia Gandhi-Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी दिल्लीत जवळपास ५० मिनिटे बैठक झाली. या बैठकीदरम्यान महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याची बातमी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील सत्तेचा फॉर्म्युला देखील ठरल्याचं वृत्तपत्राने म्हटलं आहे.

संख्याबळानुसार मंत्रीपदाचं वाटप करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्रीपद हे ५ वर्षासाठी शिवसेनेकडेच असणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं एकमत पवार-सोनिया यांच्या झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याचीचर्चा सुरु झाली आहे.

भाजपची साथ दिल्यास, राष्ट्रवादीला राज्यासह केंद्रातही मंत्रिपद मिळण्याची शक्यता

सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली याचा काहीच थांगपत्ता पवारांनी लागू दिला नाही. यामुळे वेळ काढून सरकार स्थापन करणार की नवी समीकरणं उदयाला येणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर दिल्लीत सस्पेन्स वाढलेला असताना महाराष्ट्रात आज काय घडामोडी करणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.