परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर काँग्रेसची नाहक बदनामी, सोनिया आणि राहुल गांधी नाराज

नवी दिल्ली : वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची नाचक्की होत आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या दिल्ली हायकमांडनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली असून परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात कॉंग्रेसची (Congress) नाहक बदनाम होत असल्याची भावना पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना आजच्या आज बैठक घेऊन अहवाल पाठवण्याचा आदेश दिला आहे. मुंबईतील बैठकीच्या अहवालावर स्वतः सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी निर्णय घेणार आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणात कॉंग्रेस नाहक बदनाम होतं आहे, अशी भावना हायकमांडने व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादी आणि सरकारच्या पातळीवर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारची बाजू मांडताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यात काँग्रेसचे नेते म्हणावे तितके सक्रिय झालेले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या सगळ्यावर फारशी प्रतिक्रिया देताना दिसले नाहीत.

दिल्लीत काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी रविवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील नेत्यांना यासंदर्भात निर्देश दिले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी या सगळ्यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER