सोनम कपूर करणार आंधळ्या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका

Sonam Kapoor

अनिल कपूरची (Anil Kapoor) मुलगी सोनम कपूरने (Sonam Kapoor) अत्यंत कमी कालावधीत बॉलिवुडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. तिचे करिअर आकार घेत असतानाच तिने संसारात पडण्याचा निर्णय घेतला आणि मित्र उद्योगपती आनंद अहूजाबरोबर लग्न केले. लग्नानंतरही सोनम फार कमी सिनेमात दिसली. सोनमला काही सिनेमांच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. पण तिने त्या नाकारल्या होत्या. मात्र ब्लाईंड नावाचा सिनेमा मात्र सोनमने स्वीकारला असून सोमवार 28 डिसेंबरपासून ग्लासगो येथे या सिनेमाच्या शूटिंगला ती सुरुवात करणार आहे. ब्लाईंडची संपूर्ण टीम लंडनमध्ये पोहोचली असून टीमने क्वारंटाईन होण्याचा अवधीही पूर्ण केला आहे.

ही बातमी पण वाचा:- वडिलांना आठवतं अनिल कपूर यांनी लिहिला एक खास संदेश, आज भी मेरे दिल में रहते हैं…

सोनम कपूरच्या या सिनेमाची निर्मिती निर्माता-दिग्दर्शक सुजॉय घोषच्या प्रॉडक्शन हाउसकडून केली जात आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुजॉयने त्याचा सहाय्यक असलेल्या शोम मखिजावर सोपवली आहे. शोम प्रथमच स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून या सिनेमाच्या निमित्ताने समोर येणार आहे. सुजॉय सिनेमाचा क्रिएटिव प्रोड्यूसर म्हणूनही काम करणार आहे. म्हणजेच घोस्ट दिग्दर्शन त्याचेच असणार आहे. हा सिनेमा नऊ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सुपरहिट कोरियाई सिनेमा ‘ब्लाइंड’ची रिमेक आहे. या सिनेमात पोलीस अॅकेडमीतून पास झालेली परंतु अपघाताने आंधळ्या झालेल्या मुलीची कथा मांडण्यात आलेली आहे. एका हिट अॅन्ड रन केसमध्ये ही आंधळी पोलीस ऑफिसर साक्षीदार असते. हा एक अत्यंत अॅक्शनपॅक्ड असा सिनेमा आहे. या सिनेमाच्या हिंदी रिमेकचे अधिकार सुजॉयने घेतले आहेत. व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्सही चित्रपटाच्या निर्मितीत मदत करीत आहे.

सोनम कपूरचा झोया फॅक्टर हा सिनेमा गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. प्रख्यात अभिनेता ममूटी यांचा मुलगा दुलकीर सलमान यात सोनमचा नायक होता. त्यानंतर मात्र सोनमने एकही नवा सिनेमा साईन केला नव्हता. एकाच शेड्यूलमध्ये ब्लाईंडचे जास्तीत जास्त पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित शूटिंग भारतात केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER